आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी कसे जगावे कुणीही सांगू नये:भिडेंच्या वक्तव्याचा अमृता फडणवीसांनीही घेतला समाचार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांनी कसे जगावे हे अशाप्रकारे कुणीही सांगू नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

अमृता फडणवीसांची नाराजी

‘तुझ्या कपाळाला टिकली नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही’, असे महिला पत्रकाराला म्हणणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महापुजेनंतर अमृता फडणवीस यांनीही भिडेंच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

गुरुजींबद्दल आदर, पण...

अमृता फडणवीस म्हणाल्या, मला भिडे गुरुजींबद्दल आदर आहे. ते हिंदुत्वाचे एकप्रकारे स्तंभ आहे. मात्र, अशाप्रकारे एका महिलेला कस जगाव, हे कुणीही सांगू शकत नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे. महिलेने जी काही जीवनशैली अंगीकारली आहे, त्याचा प्रत्येकाने आदर केला पाहीजे.

महिला आयोगाची नोटीस

दरम्यान, संभाजी भिडेंच्या महिला पत्रकाराबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिडेंना नोटीस पाठवत आपले आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहचविणारे असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपल्या वक्तव्याबाबत खुलासा करावा, असेही आदेश दिले आहेत. भिडे लवकरच याला उत्तर देण्याची शक्यता आहे.

मला सुरक्षेची आवश्यकता नाही

पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी आपल्या वाढवलेल्या सुरक्षेवरही भाष्य केले. अमृता फडणवीस म्हणाल्या, माझी सुरक्षा वाढवली असली तरी मला व्हेइकल किअरन्स सुविधेची आवश्यकता नाही. कारण मी एक सामान्य मुंबईकराप्रमाणे जगते. सामान्य मुंबईकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहे. आता राज्यात नवीन सरकार आले आहे. पायाभूत सोईसुविधांचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांना निश्चितच दिलासा मिळेल.

मला कुणी हात लावू शकत नाही

फडणवीस म्हणाल्या, माझी सुरक्षा वाढवली असली तरी जोपर्यंत देवाचे, लोकांचे माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीसांवर प्रेम आहे, तोपर्यंत मला कुणीही हात लावू शकणार नाही. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत मी जास्त काळजी करत नाही.

बातम्या आणखी आहेत...