आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामल्लखांब क्रीडा प्रकारात योगासनांमधील शांतता आणि जिम्नॅस्टिकमधील चंचलताही आहे. मानवी जीवनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या सर्वात स्वस्त भारतीय मातीतील मल्लखांबाचे महत्त्व मोठे आहे. जिम्नॅस्टिकमधील व्यायाम वर्ज्य नसले तरी मल्लखांब क्रीडा सरावाने शरीर पीळदार, लवचिक आणि चपळ होते, असे मत मुंबईच्या प्रख्यात आंतरराष्ट्रीय मल्लखांबपटू वैशाली खेडकर जोशी यांनी नोंदवले. त्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’शी बोलत होत्या. त्या व्यवसायाने अर्किटेक्ट असून मुंबईच्या विश्वनिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन संस्थेच्या डीन आहेत.
त्या म्हणाल्या, माझे वडील सुधाकर खेडकर १९६० पासून मल्लखांबाचा सराव करतात. आई शोभा योग शिक्षिका आहे. दोघांचा वारसा मला मिळाला. आता माझा मुलगा शार्दूल हा तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी मल्लखांबाचा वारसा पुढे नेत आहे. मल्लखांब आणि योगा हे तणावमुक्त आनंदी समाज जीवनाचे कानमंत्र आहेत, असे मला वाटते.
वडिलांच्या नोकरीमुळे बदली होत असल्यामुळे शहापूर, अहमदनगर आणि पुणे येथे शालेय व वास्तुविद्या विशारदपर्यंतचे माझे शिक्षण झाले. आर्किटेक्टची पदवी घेतल्यानंतर दिल्लीत प्रॉडक्ट डिझाइनमध्ये उच्च शिक्षण घेतले. शालेय जीवनात मल्लखांबाची प्रेरणा अहमदनगर येथील फिरोदिया हायस्कूलच्या होनाजी गोडळकर यांच्याकडून घेतली. खऱ्या अर्थाने मल्लखांब क्रीडा प्रकार खेळण्याचा माझा प्रवास तिथूनच सुरू झाला. दहावीनंतर पुणे येथील महाराष्ट्रीय मंडळ या सुप्रसिद्ध संस्थेतून मी मल्लखांब खेळले आहे. खेडकर जोशी म्हणाल्या, मी आणि माझा मुलगा शार्दूल दोघेही आठवड्यातून तीन दिवस नियमित मल्लखांबाचा सराव-प्रसार करत असतो. आई-बाबा आणि भाऊ-बहिणीदेखील मल्लखांब क्रीडा प्रकाराला सामाजिक स्थान मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत, याचे मला समाधान वाटते.
आरोग्यासाठी मल्लखांबाचे महत्त्व
मल्लखांब हा अस्सल भारतीय, महाराष्ट्राच्या मातीतला खेळ. कमीत कमी जागा आणि साधने वापरून आरोग्यदायी मल्लखांबाचा कोणत्याही वयोगटात योग्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करता येतो. अगदी लहान-मोठे, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत अशा कुठल्याच भेदाच्या चौकटी या क्रीडा प्रकाराला मान्य नाहीत. दैनंदिन मल्लखांब सरावामुळे आपले मानसिक आरोग्य उत्तम राहते. अगदी पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक अवयवाला यामुळे स्वास्थ मिळते. आजकाल चाळीशी आली की बहुतांश लोकाना काहीना काही व्याधी जडतात. स्नायूंची क्षमता आणि ताकद वाढीसाठी मल्लखांब हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढून व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक परिणाम दिसतो.
मल्लखांब अवघड नाही, सुरुवात करा...
मल्लखांब दिसायला अवघड वाटतो. अनेकांना आपल्याला हे जमणार नाही असे वाटते, पण सर्वांना आरंभ तर करावा लागतोच. सुरुवात करण्याची मानसिकता आपण आपल्यात बदलली की सगळे सोपे होईल. विशेषतः तरुण वर्गाला एकदा याची गोडी लागली की कुठेही सहज मल्लखांबाचा सराव शक्य आहे. आजचे तरुण ‘फिट’ असतील तरच उद्याचा भारत ‘फिट’ असेल. जिममधला व्यायाम हा मला वर्ज्य नाही पण मल्लखांबात जी पिळदार, लवचिक आणि चपळ शारीरिक जडण घडण होते ती क्वचितच अन्य खेळ प्रकारात होईल. हा सर्वांगाचा व्यायाम आहे. यात योगासानांमधील शांतताही आहे आणि जिम्नॅस्टिकमधील चंचलताही आहे. म्हणून मल्लखांबाचे महत्त्व मोठे आहे. ते अनुभवानेच कळू शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.