आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमामि चंद्रभागा:भीमेचा उगम ते संगम शुद्धीकरणाची घोषणा, 7 वर्षांत आराखडा पंढरपूर तालुक्यापुरता

सोलापूर / विठ्ठल सुतारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमामि गंगेच्या धर्तीवर ‘नमामि चंद्रभागा’ म्हणजेच भीमा नदीच्या उगमापासून ते कर्नाटक सीमेवरील संगमापर्यंत भीमा नदीचे प्रदूषण दूर करण्याची भीमगर्जना केली. प्रत्यक्षात २०१५ ते २०१९ या काळात आराखडा तयार केलाच नाही, तर महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प गुंडाळून ठेवला. सात वर्षात राज्य सरकारने फक्त बैठकावर बैठका घेतल्या. त्यासाठी निधीच न दिल्याने नमामि चंद्रभागा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. मुख्य सचिव, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आतापर्यंत डझनहून अधिक झालेल्या बैठकांतून फक्त आराखडेच तयार करण्यात आला. प्रत्यक्षात एकही काम सुरू करण्यात आले नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोनाचे कारण पुढे करून याची एकही बैठक झाली नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी असून उगमापासून ते संगमापर्यंतच्या शुध्दीकरणाचा आराखडा तयार करून घोषणेची पूर्तता करतील, अशी राज्यातील वारकऱ्यांची अपेक्षा आहे.फडणवीस सरकारने २०१६ साली अर्थसंकल्पात उगमापासून ते संगमापर्यत नमामि चंद्रभागा प्रकल्प राबविण्याची घोषणा केली, पण २०१९ पर्यंत फक्त आढावा आणि आराखडे इथपर्यंतच मर्यादित राहिला. जो काही आराखडा तयार करण्यात आला तो फक्त पंढरपूर परिसरापुरता मर्यादित करण्यात आला. त्यासाठीही ७ वर्षाचा कालावधी लागला. आतापर्यंत फक्त १८१ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. त्यात सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांचे नदीपात्रात मिसळणारे दूषित पाणी रोखणे आणि पंढरपूर शहरात सार्वजनिक शौचालय या दोनच प्रमुख कामांचा समावेश आहे. उगमापासून ते संगमापर्यंत नदीचे प्रदूषण कमी करण्याची फडणवीस यांची घोषणा होती, त्याला फाटा देत फक्त पंढरपूर तालुक्यापुरताच आराखडा तयार करण्यात आला.

आराखड्यात या कामांचा समावेश... सार्वजनिक शौचालय उभारणी - वारीकाळात नदीचे पावित्र्य जपण्यासाठी पंढरपूर शहर व परिसरातील ६ ठिकाणी २३५ शीटचे सार्वजनिक शौचालय उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये कॉटेज हॉस्पिटल, ६५ एकर, आंबेडकर नगर, जकात नाका, सांगोला रोड, गोपाळपूर याठिकाणी हे सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार आहेत, पण आतापर्यंत फक्त आराखडे तयार करण्यात आले आहेत, प्रत्यक्षात एकाही ठिकाणचे काम सुरू झाले नाही.

सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापन - नगरोत्थान योजनेतून पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात येणार आहे. दोन्ही कामांचा आराखडा तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे, पण अद्याप त्याला मंजुरी नाही. यामुळे दोन्ही प्रकल्प अजून कागदावरच आहेत. यामुळे भीमेत शहरातील सांडपाणी मिसळतच आहे.

फडणवीस यांनी योजनेस गती देण्याची गरज महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत नमामि चंद्रभागा अभियानाकडे साफ दुर्लक्ष झाले. कोरोनाचे कारण सांगत बैठकच घेण्यात आली नाही. कोरोनानंतर मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून बैठक रद्द करण्यात आली. पुन्हा शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी २० ऑक्टोबर रोजी बैठक घेतली, पण त्या बैठकीत फक्त आढावा घेण्यात आला, प्रकल्पाच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्याचे सूचना देण्यात आल्या. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेल्या योजनेस स्वत:हून गती देण्याची गरज आहे.

नदीघाटाचे सौंदर्यीकरणाचे नुसतेच आराखडे नदीकाठावरील अकलूज, यशवंतनगर, संग्रामनगर, मळेवाडी, गोपाळपूर, माळीनगर व गुरसाळे या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत, सांडपाणी प्रक्रियांचे आराखडे सादर करण्यात आले आहेत, पण अद्याप त्यासाठीही निधीच मिळाला नाही. या अभियानांतर्गत नदीघाटाचे सौंदर्यीकरण व वनीकरण या कामांचा समावेश आहे. पण या कामांचे फक्त आराखडे तयार झाले,पण त्यासाी ना मंजुरी मिळाली ना निधी. यामुळे हे काम पण कागदावरच आहे.

बातम्या आणखी आहेत...