आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर तोडगा निघाला:प्रत्येक पालखीसोबत 30 वारकऱ्यांना पंढरपूरपर्यंत पायी जाण्यास परवानगी

पंढरपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुकाराम महाराजांची पालखी पंढरपुरात दाखल झाली. (इन्सेटमध्ये) तुकारामांच्या पादुका - Divya Marathi
तुकाराम महाराजांची पालखी पंढरपुरात दाखल झाली. (इन्सेटमध्ये) तुकारामांच्या पादुका

आषाढी एकादशीसाठी पंढरीच्या वेशीवर आलेल्या वारकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सुमारे एक ते दीड तास पालख्या पालखी तळावर थांबल्या. अखेर प्रशासनाने आपली भूमिका बदलून प्रत्येक पालखी सोहळ्यातील ३० वारकऱ्यांना विसावा मंदिरापासून पालखीसोबत पंढरपूरपर्यंत पायी जाण्यास परवानगी दिली.

आषाढी यात्रेसाठी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करून एसटी बसने आलेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी वाखरी येथे आक्रमक भूमिका घेतली. प्रशासन आणि पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांत बराच वेळ चर्चा झाली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी पायी सर्व ४० वारकऱ्यांसह पंढरीत जाऊ, अन्यथा इथेच थांबू अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण यापूर्वी शासनाने वाखरी ते विसावापर्यंत प्रत्येक पालखीसोबत ४० वारकरी पायी जातील आणि विसावा येथून पंढरपूरपर्यंत प्रत्येक पालखीसोबत केवळ दोन वारकऱ्यांना पंढरपुरात पायी जाण्यास परवानगी दिली होती. वारकऱ्यांनी ऐनवेळी हा प्रस्ताव नाकारून सर्व ४० वारकऱ्यांसह जाऊ, अन्यथा नाही, अशी ठाम भूमिका घेतली. अतिरिक्त पोलिस आधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी वारकऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारकरी आपल्या निर्णयावर ठाम होते.

मागणी मान्य झाल्यानंतरच पालख्या पंढरीकडे
शेवटी वाखरी ते इसबावी विसावा मंदिरापर्यंत सर्व ४० वारकरी एसटी बसमधून आणि तेथून पंढरपूरपर्यंत प्रत्येक पालखी सोहळ्यातील ३० वारकरी पालखीसोबत पंढरपुरात पायी जातील, उर्वरित वारकरी बसने जाण्याचे मान्य केले. त्यामुळे मार्ग निघाला. प्रशासनानेही भूमिका लवचिक करीत वारकऱ्यांची मागणी मान्य केली. त्यानंतर पालखी सोहळे पंढरीकडे मार्गस्थ झाले. प्रशासन आणि वारकऱ्यांच्या बैठकीत मानाच्या दहा पालख्यांच्या प्रमुखांसह संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी देवव्रत महाराज वासकर, शितोळे सरकार तर प्रशासनाकडून अतिरिक्त पोलिस अधीक्षक झेंडे, ढोले यांनी सहभाग घेतला.