आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत रखमाबाई ग्यानबा देवकर ( ९८) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारानंतर उरलेली राख चोरीस गेल्याचे बुधवारी उघडकीस आले. मृत रखमाबाई यांच्या अंगावर दहा तोळ्यांपेक्षा अधिक सोने होते. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर नातेवाइकांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सोन्यासाठीच राख चोरल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे.
गेल्या काही वर्षांपासून या स्मशानभूमीत असे प्रकार घडत आहेत. अंत्यसंस्कारांनंतर नातेवाईक तिसऱ्या विधीसाठी स्मशानभूमीत सावडण्यासाठी येतात तेव्हा नातेवाईकांना संपूर्ण राख अगदी झाडूनपुसून नेल्याचे दिसून येते. सवाष्ण महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सौभाग्य अलंकार म्हणून मंगळसूत्र किंवा सोन्याचे मणी गळ्यात तसेच ठेवून अंत्यसंस्कार केले जातात. चोरलेली राख गाळून, चाळून वितळलेले सोने, चांदी काढली जाते.
तिसरा विधी झालाच नाही
रखमाबाई माझ्या मावशी होत्या. तिसऱ्या दिवशीच्या विधीसाठी आलो असता अंत्यसंस्कार केलेल्या जागेवर चिमूटभरही राख नव्हती. त्यामुळे आम्हाला तिसरा विधी करता आला नाही. याठिकाणी सुरक्षारक्षक नेमून सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. - दगडूशेठ घोडके, माजी नगराध्यक्ष
विसर्जनावेळी राख हिसकावण्याचे प्रकार
पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात तिसऱ्या दिवशीचे विधी केल्यानंतर रक्षा विसर्जनासाठी पंढरपूर येथे नदीकाठी येतात. अहिल्या पुलावरून ही राख थेट नदीत टाकली जाते. त्यावेळी पुलावर असलेले पंढरपूर शहरातील काही युवक रक्षा विसर्जन करणाऱ्या लोकांना अडवतात. राख आमच्याकडे द्या, आम्ही टाकतो अशी विनवणी करतात. त्यानंतरही नाही दिली तर हिसकावून, धमकावून राख घेतात.
सीसीटीव्ही नाही, स्वच्छताही नाही
या स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. स्वच्छता तर अजिबात नाही. राख सावडल्यानंतर नातेवाईकांना हात धुण्यासाठी पाण्याचीही सोय नाही. बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था नाही. परिसरात भटकी कुत्री, डुकरे, गाढवे यांचा मुक्त संचार असतो.
८५ वर्षांपूर्वी लग्नात मिळालेले दागिने
रखमाबाई ग्यानबा देवकर यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री अंत्यसंस्कार झाले. बुधवारी तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यात आला. त्यांच्या दोन्ही हातांत सुमारे ८५ वर्षांपूर्वी लग्नात आलेले सुमारे १० तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने होते. रखमाबाई देवकर या वडार समाजाच्या होत्या. या समाजात मृताच्या अंगावरील दागिने काढून घेतले जात नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.