आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:अनुदानाविना "सॅनिटरी पॅड’च्या अस्मिता योजनेला बसली खीळ; राज्यातील अनेक जिल्ह्यांत विद्यार्थिनींना योजनेचा लाभच नाही

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी मंत्री पंकजा मुंडेंनी योजना सुरू केल्याचा क्षण.

गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे अनुदान दिले नाही हे कारण पुढे करत किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड अल्पदरात देण्याच्या अस्मिता स्मार्ट कार्ड योजनेला खीळ बसली आहे, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर वरिष्ठ अधिकारी यंत्रणेने दिली आहे. राज्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने केवळ पाच रुपयांत दर महिन्याला मासिक पाळीच्या काळात स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत सॅनिटरी पॅड देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात राज्यातील अनेक जिल्ह्यात विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे किशोरवयीन मुलींना मिळणारा आरोग्याच्या दृष्टिकोनातून या मदतीचा प्रवाह संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये थांबला आहे.

ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थिनींना पंकजा मुंडे यांनी स्मार्ट कार्ड योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला सॅनिटरी पॅड देण्याची व्यवस्था केली होती. मात्र गेल्या वर्षभरात या किशोरवयीन मुलींना सॅनिटरी न पॅड देऊन थेट योजना गुंडाळण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या या योजनेला सरकार बदलले की योजना बदलली अशा भावनेने योजना चक्क गुंडाळली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याकरिता अनुदानाच्या तत्वावर राज्य शासन ग्राम विकास मंत्रालय या विभागाला कोट्यवधी रुपये द्यायचे. मात्र लॉकडाऊनचे कारण पुढे करत निधी नाही, असे सांगून गेल्या वर्षभराचे अनुदानच देण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना अनुदानाच्या माध्यमातून केवळ पाच रुपयांत मिळणाऱ्या या सॅनिटरी पॅडसाठी आता बाहेरून खरेदी करत अधिक रुपये मोजावे लागणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

अशी आहे योजना
ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलींकरिता दर महिन्याच्या मासिक काळात केवळ पाच रुपयांत मुलींना सॅनिटरी पॅड दिले जायचे. एक वर्षापूर्वी राज्यातील सात लाख विद्यार्थिनींना उमेद प्रकल्पाच्या अंतर्गत शाळाशाळांमधून हे सॅनिटरी पॅड दिले जात होते.

योजना बंद व्हायला नको
अस्मिता योजना मुलींसाठी उपयुक्त आहे. पाच रुपयांत सॅनिटरी पॅड आम्ही उपलब्ध करून दिला. सरकारने या योजनेत बदल केला तर हरकत नाही, पण बंद करायला नको. यासाठी आर्थिक तरतूद करून योजना पुढे सुरू ठेवण्याची उपाययोजना कराव्यात. -पंकजा मुंडे, माजी ग्रामविकासमंत्री

वर्ष झाले, लाभ नाही
गेले वर्षभर आम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही. मी सध्या सातवीत शिकते आहे. पण एकदाही सॅनिटरी पॅड आम्हाला पाच रुपयांत मिळाल्याचे आठवत नाही. आमच्यापर्यंत याचा लाभ आलेलाच नाही. -संजना - विद्यार्थिनी, तरंगेवाडी जि.प. शाळा, सांगोला

बातम्या आणखी आहेत...