आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:पोलिसांचे चौकशीचे आश्वासन, दोघांचेही मृतदेह घेतले ताब्यात

मोहोळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लांबोटी पुलावरील अपघात, घातपात असल्याचा नातेवाइकांचा संशय

लांबोटी येथे झालेल्या अपघातप्रकरणी मृतांच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत तब्बल २७ तास मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. पोलिस प्रशासनाने मृतांच्या नातेवाइकांची समजूत काढली. तसेच संशयाच्या अनुषंगाने संबंधितांचे मोबाइल कॉल डिटेल्स तपासून चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिले. शवविच्छेदनानंतर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतले. दोघांवरही नजीक पिंपरी येथे शोकाकुल वातावरण व पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार केले.

दीपक बाळासाहेब सरवदे, विक्रम नागनाथ प्रक्षाळे (रा. नजीक पिंपरी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मोहोळहून सोलापूरकडे निघालेला एमएच ४३ ई ४४६९ या क्रमांकाच्या टँकरने लांबोटी येथील सीना नदीवरील पुलावर सोलापूरकडे निघालेल्या एमएच ४५ एके ११३२ या क्रमांकाच्या मोटारसायलला धडक दिली होती. त्यामुळे संदीप दादा रणखांबे (रा. भोसरे, ता. माढा) याची मोटारसायकल समोरून येणाऱ्या (एमएच १३ सीसी ७७४०) या क्रमांकाच्या मोटारसायकलला जोराची धडक बसली. यात अपघातात दीपक सरवदे व विक्रम प्रक्षाळे हे जागीच ठार झाले होते. तर संदीप रणखांबे हा जखमी झाला होता. याप्रकरणी टँकर चालक सचिन जरासंध चव्हाण (रा. बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर) याच्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे ३.१३ वाजता गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर खारगे तपास करत आहेत.

हा अपघात नव्हे, घातपात असल्याचा आरोप करत मृतांच्या नातेवाइकांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी गुरुवारी येथील पोलिस ठाण्यात घोषणा देत मोर्चा आणला होता. तसेच गुन्हा दाखल होईपर्यंत दोन्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाइकांनी भूमिका घेतल्यामुळे पोलिस ठाणे व ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ग्रामीण रुग्णालय आवारात पोलिस फौजफाटा
उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती हे गुरुवारी रात्रीपासून मोहोळमध्ये ठाण मांडून होते. या वेळी पोलिस निरीक्षक अशोक सायकर, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, कामतीचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, मंद्रूपचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन थेटे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर खारगे, धनाजी खापरे यांच्यासह मोठा फौजफाटा पोलिस ठाण्यासह ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ठेवण्यात आला होता.

संशयाच्या अनुषंगाने तपास करण्यात येईल
मृताच्या नातेवाइकांना वारंवार विनंती करून अपघाताची फिर्याद देण्याबाबत सांगितले. त्यानंतरही त्यांनी फिर्याद न दिल्याने रात्री उशिरा पोलिसांनीच फिर्याद दाखल केली. नातेवाइकांनी हा अपघात नव्हे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने तपास केला जाईल. अशोक सायकर, पोलिस निरीक्षक, मोहोळ

बातम्या आणखी आहेत...