आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाला नागराज मंजुळेंची भेट:मित्राच्या पीएचडी मौखिक परीक्षेसाठी लावली हजेरी; कुलगुरूंसोबत साधला संवाद

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोमवारी (21 नोव्हेंबरला) आपल्या मित्राच्या पीएचडीच्या खुल्या मौखिक परीक्षेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात हजेरी लावली. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

नागराज मंजुळे यांचे मित्र विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी येथील प्रा. संजय साठे यांच्या पीएचडीची खुली मौखिक परीक्षा सोमवारी दुपारी होती. प्रा. साठे यांनी सैराट चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारलेली आहे. ते मंजुळे यांचे गाववाले मित्र आहेत. प्रा. साठे यांनी प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली आहे. सोमवारी त्याची अंतिम खुली मौखिक परीक्षा होती. त्यासाठी खास नागराज मंजुळे हे उपस्थित राहिले.

कुलगुरूंसोबत रंगल्या गप्पा

परीक्षा सुरू होण्यापूर्वी नागराज मंजुळे यांनी कुलगुरू दालनात येऊन डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह डॉ. महेंद्र कदम, डॉ. केदारनाथ काळवणे, प्रा. साठे, डॉ. मलिक रोकडे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. दत्ता घोलप आदी उपस्थित होते.

काय म्हणाले नागराज मंजुळे ?

याप्रसंगी बोलताना नागराज मंजुळे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यासाठी एकमेव विद्यापीठ असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे गरजू विद्यार्थी मोठ्या शहरांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ फायदेशीर ठरत आहे.

विभागाला भेट देऊन पाहणी

सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात चित्रपट निर्मिती या विषयावर कार्यशाळा घेऊ तसेच त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यास मला आवडेल, असे यावेळी बोलताना मंजुळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यापीठ परिसराची व विविध संकुलाची पाहणी करत माहिती घेतली. तसेच मास कम्युनिकेशन विभागाला भेट देऊन टीव्ही व रेडिओ स्टुडिओची पाहणी करून आनंद व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...