आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिन:बंगळुरू-मुंबई उद्यानला झाला नारी स्पर्श, पुण्यापर्यंत धावली महिला संचलित रेल्वे

सोलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळ सकाळची. सर्व महिलांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता. मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकात बंगळुरूहून आलेली आणि मुंबईला जाणारी उद्यान एक्स्प्रेस महिलांनी आपल्या हाती घेतली. अगदी चालकापासून ट्रॅकमनपर्यंत सर्वच जागा महिलांनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे बुधवारी उद्यान एक्स्प्रेसला नारी स्पर्श झाला. निमित्त होते जागतिक महिला दिनाचे.

गाडी क्रमांक ०१३०२ बंगळुरू-मुंबई उद्यान एक्स्प्रेसचे संचालन लोको पायलट अनिता राज, सहायक लोको पायलट भावना कोष्टा, गार्ड वैशाली भोसले, स्टेशन मास्टर सुहासिनी शिंदे तसेच तिकीट तपासनीस, हेल्पर, टेक्निशिएन स्टाफ, ट्रॅकमॅन आणि सुरक्षा राक्षकांसह महिला कर्मचारी कार्यरत होते. प्रतिभा गुप्ता अध्यक्षा महिला कल्याण संगठन यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या उपस्तिथीत हिरवा झेंडा दाखवून उद्यान एक्स्प्रेस सोलापूरहून रवाना केली.

उल्लेखनीय सेवा करण्याऱ्या सोलापूर विभागातील महिला कर्मचाऱ्यांना विभागीय रेल्वे प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी अप्पर विभागीय रेल्वे प्रबंधक शैलेंद्रसिंह परिहार, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी जी. पी. भगत, वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे, वरिष्ठ मंडल यांत्रिक इंजिनिअर संजय साळवे, मंडल कार्मिक अधिकारी रमेश अय्यर, शाखा अधिकारी, मान्यता प्राप्त युनियनचे व असोसिएशनचे पदाधिकारी, लाभ निधीचे सदस्य, कल्याण संगटनच्या कार्यकारी सदस्या व महिला कर्मचारी उपस्थित होते.

अनेकांनी काढून घेतली सेल्फी
सकाळी सव्वादहा वाजता फलाटावर कार्यक्रम सुरू झाला. महिला उद्यान एक्स्प्रेस चालवणाऱ्या लोको पायलट, ट्रॅकमॅन, टेक्निशियन, तिकीट तपासणीस, स्टेशन मास्टर अशा सर्व महिला रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत उभे राहून असंख्य लोकांनी सेल्फी अन् फोटो काढून घेतले. यामुळे महिला कर्मचारी सुखावल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...