आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसआरपीएफ पोलिसाने केला गोळीबार:पत्नीच्या चारित्र्यावरून संशय, गावातील प्रतिष्ठित मंडळी वाद मिटविण्यासाठी आली असता केला गोळीबार, 1 ठार, 1 जखमी तर दोघे जण बचावले

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भातंबरे (ता. बार्शी) येथे पत्नीच्या चारित्र्यावरून संशयाचा राग मनात धरून, कुटुंबासह गावातील प्रतिष्ठित मंडळी वाद मिटविण्यासाठी जमलेली असताना, एसआरपीएफ पोलिसाने स्वतःच्या शासकीय पिस्तूलमधून चारवेळा गोळीबार केला. यात एकजण ठार तर एकजण जखमी झाला आहे. तर दोघे जण गोळीबारातून बचावले. ही घटना बुधवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान घडली. वैराग पोलिस ठाण्यात पोलिसाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवान गुरुबा व त्याच्या पत्नीचे भांडण झाल्याने सापनाई येथून भातंबरे येथे रात्री नऊच्या दरम्यान गेले होते. बहिणीला गावाकडे घेऊन येण्यासाठी तसेच भांडण मिटविण्यासाठी काळे यांच्यासह त्यांचे मित्र नितीन भोसकर, जालिंदर काळे सोबत होते. त्यावेळी सासू, सासरे, चुलत भाऊ, प्रमोद वाघमोडे यांच्यासह प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.

यावेळी बहिणीला तुझी बॅग भर आम्ही तुला घेऊन जातो, असे म्हणताच पोलिस गुरुबा महात्मे याने स्वतःकडे असलेल्या शासकीय पिस्तूलमधून गोळीबार केला. गोळीबारात नितीन भोसकर व बालाजी महात्मे यांना गोळी लागून जखमी होऊन खाली पडले तर काशीनाथ काळे व जालिंदर काळे पळून जात असताना गोळीबार केला, पण गोळी लागली नाही.

उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दोघांना दाखल करण्यात आले. भोसकर यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले तर महात्मे यास सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी जवान गुरुबा महात्मे यास अटक केली असून, पिस्तूल, 26 जिवंत राउंड जप्त केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनय बहिर करीत आहेत.

एसआरपीएफ मुंबई येथे पोलिस म्हणून कार्यरत असलेल्या गुरुबा तुकाराम महात्मे (रा. भातंबरे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काशीनाथ काळे (रा. सापनाईता, कळंब) यांनी फिर्याद दाखल केली. नितीन बाबूराव भोसकर (रा. सापनाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बालाजी महात्मे जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...