आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूर:आमदार व विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भारत भालके यांचे पुण्यात कोरोनाने निधन

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके (६०) यांचे शुक्रवारी मध्यरात्री कोरोनाने निधन झाले. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली असा परिवार आहे. पुणे येथे उपचारानंतर कोरोनावर मात करत दिवाळीपूर्वीच ते घरी परतले होते. काही दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात भारत भालकें यांचा जन्म झाला. घराण्यातून कोणताही राजकीय वारसा नसताना देखील सर्वसामान्य मतदारांशी जोडलेल्या नाळेमुळेच भारत भालके यांनी सलग तीन वेळा विधानसभेत निवडून जाण्याची किमया करुन दाखविली. येथील चिंचबन तालमीत पैलवानकी केलेल्या भालकेंनी राजकारणाच्या आखाड्यात देखील आपला दबदबा निर्माण केला होता. आक्रमक व्यक्तीमत्व, चांगला जनसंपर्क, निवडणुकीतील राजकीय डावपेचांमध्ये माहिर, संभाषण चार्तुयात अव्वल, पाठपुराव्याची वृत्ती, सर्वसामान्य मतदारांसाठी कुणालाही शिंगावर घेण्याची तयारी या स्वभाव गुणामुळे राजकारणात थोड्या काळात त्यांनी मोठी झेप घेतली होती.

साखर कारखान्याच्या अध्यक्षपदा पासून ते आमदारकीच्या खुर्चीवर विराजमान झाल्यावरही कोणताही अहंमभाव त्याना नसायचा. रस्त्यावरुन गाडीतून ये जा करताना कोणीही त्यांना रस्त्यात हात केला तर थांबणे, त्यांच्या बरोबर आपुलकीने गप्पा मारणे अगदी टपरीवर उभा राहून त्याच्या बरोबर चहा पिणे या त्यांच्या स्वभाव गुणामुळे सर्वसामान्यांमध्ये ते लोकप्रिय होते. कोणाच्याही सुखदु:खाच्या प्रसंगी मदतीचा हात पुढे करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे भालके यांनी हजारो लहान मोठे लोक जोडले होते. या जोडलेल्या एक एक लोकांच्या मतावर तीन वेळा आणि ती ही वेगवेगळ्या पक्षातून तिकीटावर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवित जिल्ह्यात दबदबा निर्माण केला होता. विट्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदा पासून त्यांच्या राजकीय घौडदौडीला खऱ्या अर्थाने बहार आला. माजी आमदार (कै.) ओदुंबर पाटील आणि (कै.) वसंतराव काळे यांच्या निधना नंतर विठ्ठल परिवाराची मोडकळीस आलेली मोट पुनश्च त्यांनी बांधली होती.

विधानसभेच्या २००४ मध्ये लढविलेल्या पहिल्याच निवडणूकीत पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले. २००९ मध्ये मतदार संघ पुनर्रचनेत पंढरपूर- मंगळवेढा या नवीन विधानसभा मतदार संघाची निर्मिती झाली. त्यावेळी विजयसिंह मोहितें सारख्या दिग्गजाचा पराभव करुन रिडालोस तर्फे निवडणूक लढविलेले भारत भालके जायंट किलर ठरले होते. त्या नंतर २०१४ मध्ये जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष असलेल्या प्रशांत परिचारकांचा तसेच २०१९ मध्ये सहकारातील डाँक्टर म्हणून ओळख असलेल्या सुधाकर परिचारकांचा देखील पराभव त्यांनी केला होता. आमदार भालकेंचे ज्येष्ठ नेते शरद पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,अजित पवार, देवेंद्र फडणवीस तसेच विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आदी वरिष्ठ नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. सलग अकरा वर्षे आमदार म्हणून ते कार्यरत होते. अत्यंत महत्वकांशी, प्रचंड आत्मविश्वास असणारे तसेच कुणाचीही भिड न ठेवता सर्वसामान्यांसाठी लढणारे नेते अशी देखील त्यांची वेगळी ओळख होती.

विठ्ठल कारखान्यावर २००२ पासून एकहाती सत्ता
तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्यावर तत्कालीन कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव काळे यांच्या निधना नंतर कारखान्याची धुरा भारत भालकेंच्या हाती आली. विठ्ठल कारखान्यावर २००२ पासून ते आजतागायत त्यांची एकहाती सत्ता आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला आलेल्या आर्थिक अडचणींमुळे गतवर्षीचा गळीत हंगाम होवू शकला नाही. कारखान्याला भेडसावणाऱ्या आर्थिक चंचंणीमुळे गेल्या एक, दोन वर्षापासून ते थोडे चिंताग्रस्त होते.

इतर सत्तास्थाने देखील केली होती काबिज
आपल्या हक्काच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्या बरोबरच मंगळवेढ्यातील दामाजी कारखान्यावर देखील पहिल्यांदा आमदार झाल्यावर आपली एकहाती सत्ता त्यांनी प्रस्थापित करण्याची किमया करुन दाखविली होती. या बरोबरच विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतून आपले उमेदवार त्यांनी निवडून आणले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser