आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक जाणिवा समृद्ध करून नेहमीच सामाजिक उपक्रमातून वैविध्यता जपणाऱ्या येथील डॉटर्स मॉम फाउंडेशनने माळशिरस तालुक्यातील गरजू मुलींसाठी सायकल बँक या उपक्रमाला सुरुवात केली आहे. या सायकल बँकेस सुरुवातीला ५० सायकली दिल्या आहेत. येत्या पाच वर्षांत शाळेपासून तीन किलोमीटर दूर राहणाऱ्या तीन हजार ६५० मुलींना सायकल देण्यात येणार आहेत. त्यासाठी एक कोटी ४५ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती फाउंडेशनच्या संस्थापिका शीतलदेवी मोहिते यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये सुमारे साडेसहा हजार मुली शिक्षण घेत आहेत. शाळेपासून तीन किलोमीटरहून अधिक अंतरावर राहणाऱ्या मुलींना केवळ दूरवरच्या अंतरामुळे शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होता येत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यासाठी सामाजिक जाणिवा जोपासत डॉटर माॅम्स फाउंडेशनने आमदार रणजितसिंह मोहिते यांच्या सन्मानार्थ सायकल बँक उपक्रमास सुरुवात केली आहे. डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील अनेक सेवाभावी वृत्तीच्या नागरिकांनी सायकल बँक उपक्रमाला आर्थिक मदत तर काहीनी सायकल दिली आहे.
या सायकल वाटप समारंभास आमदार रणजितसिंह मोहिते, सत्यप्रभादेवी मोहिते, भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी प्रदीप कर्डे, केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
अशी आहे संकल्पना, एक कोटी ४५ लाखांचा खर्च अपेक्षित
डॉटर्स मॉम फाउंडेशन पाचवी ते सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद व खासगी शाळांना वाटप करणार आहे. शाळेपासून तीन किलोमीटर लांब अंतरावरील गरजू ३६५० मुली आहेत. येत्या पाच वर्षांत त्या सर्वांना सायकलीचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे एक कोटी ४५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. शिक्षण संपल्यानंतर शाळा सोडून जाताना त्या मुलींनी त्या सायकली पुन्हा शाळेकडे जमा करावयाच्या आहेत. पुन्हा त्या सायकली गरजू मुलींना वाटप करण्यात येणार आहेत. हीच सायकल बँकेची संकल्पना असल्याचे शीतलदेवी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.