आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी मुलाखत:सत्तेसाठी मोठे पक्ष आम्हाला जवळ करतात, पण एकदा सत्ता आली की त्यांना माज चढतो : राजू शेट्टी

सोलापूर | मनोज व्हटकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०१४मध्ये शिवसेना-भाजप आणि २०१९नंतर मविआसोबत काही पावले चाललेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत आगामी वाटचालीविषयी भूमिका स्पष्ट केली.

तुम्ही स्वत: निवडणूक लढवणार का? संघटनेची पुढील राजकीय रणनीती काय असेल?
राजू शेट्टी :
मी लोकसभेला हातकणंगलेमध्ये मतदारांकडे जाऊन मते मागणार आहेच. पण आम्ही सहा ते सात जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा अशा मतदारसंघांत आमचे उमेदवार निवडणूक लढवतील. अन्य मतदारसंघांत एकमेकांना प्रतिस्पर्धी होणार नाही अशा पद्धतीने समविचारी पक्षांबरोबर राहू.

भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, या मतप्रवाहाविषयी आपली भूमिका काय?
राजू शेट्टी :
मोदींविरोधात लढण्याचा ठेका काय आम्हीच घेतलाय का? विरोधात लढताना आमच्यासारख्या छोट्या पक्षांना मोठे पक्ष जवळ करतात. सत्तेत आले की त्यांना माज चढतो. ते आम्हाला वेगळी वागणूक देतात. गेल्या अडीच वर्षांत मविआकडून आम्ही हाच अनुभव घेतला. त्यामुळे यापुढे स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

शरद जोशींनंतर शेतकरी संघटनेत सातत्याने फूट पडली, नेते बाहेर पडले, संघटना एकसंघ का ठेवता आली नाही?
राजू शेट्टी :
कोणताही पक्ष, संघटना असो की चळवळीतील कार्यकर्ता, आठ - दहा वर्षे तो चळवळीत झोकून देऊन काम करतो. त्यानंतर त्याच्यातील स्वार्थ जागा होतो. कारण आजकाल काहीही कष्ट न करता राजकारणात, चळवळीत मोठे होणारे नेते त्याला दिसतात. त्यामुळे मग आपण का मागे असा विचार करून तो वेगळी वाट चोखाळतो.

कोकणातील बारसू आंदोलनाबाबत शेतकरी संघटनेची भूमिका काय?
राजू शेट्टी :
ते शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. त्यांनीच आम्हाला बोलावले आहे. त्यामुळे मी तेथे जाणार आहेच. जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर पर्याय शोधला पाहिजे ही आमची भूमिका ‌‌‌‌‌‌‌‌आहे.

राज्यातील अस्थिरता कधी निवळेल?
राजू शेट्टी :
कोणतेही सरकार असो, चांगले होते असे म्हणण्याची स्थिती नाही. सध्याचे सरकार दहा महिने होऊनही सावरलेले नाही. केवळ एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्यातच सर्व मश्गूल आहेत. सर्वसामान्य लोक, शेतकऱ्यांचे प्रश्न वाऱ्यावर आहेत. वीज दरवाढीकडे कुणाचेही लक्ष नाही.

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यात कोट्यवधी रुपये घेतले जातात, या आपल्या आरोपाचे काही पुरावे, तपशील आहे का?
राजू शेट्टी :
वरिष्ठ पातळीपासून ते खालपर्यंत बदल्यांसाठी पैसे घेतले जातात हे उघड गुिपत आहे. जे पैसे देऊन बदल्या करून घेतात ते मग खाली येऊन लुबाडतात.

बदल्यांतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय उपाय करता येतील?
राजू शेट्टी
: बदल्यांमधील मंत्री, आमदारांचा हस्तक्षेप आधी रोखला पाहिजे. त्यांचे त्यातील अधिकार काढले पाहिजेत. जे अधिकारी, कर्मचारी तीन, पाच वर्षांनी बदलीला पात्र आहेत, त्यांची क्रमवारीने यादी तयार करावी. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय ही यादी पुढे सरकेल अशा पद्धतीने बदल्या होतील, असे एखादे सॉफ्टवेअर विकसित करण्याची गरज आहे. सैन्यातील जवान कुठेही सीमेवर जाऊन ड्यूटी करतात. मग या अधिकाऱ्यांना का जमत नाही? बदल्यांबाबत कोणत्याच सरकारने अात्तापर्यंत चांगले काम केलेले नाही.