आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानपरिषद:यंदा भाजप सरस; पण चमत्काराची ‘परतफेड’ आघाडीला महाकठीण विधानपरिषद

सोलापूर / विठ्ठल सुतारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीनंतर निवडणूक आयोग विधानपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. भाजपने आमदार प्रशांत परिचारक यांनाच उमेदवारी देत त्यांचे नाव जाहीर केले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप गुलगस्त्यात आहे. मतदारांच्या संख्येच्या तुलनेत महाआघाडीपेक्षा भाजपची सरशी दिसत आहे.

मागील निवडणुकीत ताकद जास्त असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करून भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक निवडून आले होते. यंदा भाजपचे मतदार जास्त आहेत. मागील चमत्काराची परतफेड करणे महाआघाडीला महाकठीण आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकांमधील संख्याबळ पाहता भाजपचे तगडे आव्हान राष्ट्रवादीसमाेर असणार आहे. ४१० पैकी भाजपकडे २२३ मतदार असल्याचे गणित आहे. तर महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्याकडे १५५ चे संख्याबळ आहे. यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार काेण असणार आहेॽ त्यावरच पुढील गणिते अवलंबून राहणार आहेत.

निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांची नावे चर्चेत आहेत. पण अद्याप यावर तिन्ही पक्षाकडून एकमत झाले नाही.

मागील विधानपरिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद अधिक हाेती. पण राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे यांचा पराभव झाला. तर भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक विजयी झाले. यंदा उलट परिस्थिती आहे. भाजपचे मतदार अधिक आहेत. पण राज्यात भाजपची सत्ता नसल्याने काय बदल हाेणारॽ हे पाहावे लागणार आहे.

महाविकास आघाडीला केवळ चमत्काराची अपेक्षा
भाजप २२३, शिवसेना ७४, काँग्रेस व राष्ट्रवादी ८१, एमआयएम ११, बसप ३, अपक्ष १८ अशी सदस्य संख्या आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काही बदल झाला आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकांमध्ये काही आघाड्या आहेत. परिस्थिती पाहून आघाडी काेणत्या गटात जाणार, हे ठरणार आहे. स्थानिक संस्थेतील सदस्यांची संख्या पाहता भाजप तुल्यबळ वाटत आहे. भाजप उमेदवाराचा पराभव हाेण्यासाठी महाविकास आघाडीला चमत्कार करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...