आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविठ्ठल मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांची झाडाझडती घेतली जाते. मात्र पुण्यातील एका गोल्ड मॅनसह भाजपच्या नेत्याने थेट मंदिर प्रवेशापासून ते विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवण्यापर्यंतचे व्हिडिओ शूटिंग केल्याचे शनिवारी समोर आले आहे. सुरक्षेसाठी विठ्ठल मंदिराच्या चारही बाजूला कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. मंदिरात सामान्य भाविकास कोणतीही वस्तू नेण्याची परवानगी नाही. मोबाइल, पर्स आणि पिशव्या बाहेर ठेवून मंदिरात जाणाऱ्या भाविकांची अतिशय अपमानास्पद तपासणी केली जाते. प्रासादिक वस्तू, एखादी पर्स सोबत असेल तर ती स्कॅनर मशिनमधून तपासून आत सोडले जाते.
मात्र शनिवारी पुण्यातील उमेश तागुंदे नावाच्या अंगभर सोने मिरवत आलेल्या कथित गोल्डमॅनला मात्र मोबाइलसह मंदिरात प्रवेश दिला गेला. संत नामदेव महाराज समाधीपासून मंदिरात प्रवेश करीत असतानाच त्या गोल्ड मॅनने व्हिडिओ शूटिंग सुरू केले. विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवण्यापर्यंतचे शूटिंग केले. भाजप नेते पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे आपल्या कार्यकर्त्यांसह विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ यांनी व्हीआयपी प्रवेश द्वारातून मंदिरात प्रवेश करतानाच मोबाइलमध्ये शूटिंग सुरू केले. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेत असताना त्यांनी मंदिरातील विविध ठिकाणी नतमस्तक झाल्याचेही शूटिंग केले आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान याबाबत मंदिर समितीसमोर हा विषय ठेवू, त्यानुसार दोषींवर कारवाई करण्याचे व्यवस्थापक पुदलवाड यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.