आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सवाल:रामाच्या नावाने शरद पवारांच्या पोटात का दुखते ? चंद्रकांत पाटील

गणेश जोशी | सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपला ‘ऑपरेशन लोटस’ची गरज नाही
  • शरद पवारांच्या ‘चाणक्य’ भूमिकेमुळे आम्हाला विरोधी पक्षात बसावे लागले

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राम मंदिर उभारले जाणार आहे. त्यासाठी भूमिपूजन होणे अत्यंत गरजेचे असताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून शरद पवार दुटप्पी भूमिका घेत असून राम मंदिराचे नाव घेतले की पवारांच्या पोटात का दुखते, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

कोल्हापूर दौऱ्यावर आले असता हातकणंगले येथे चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या गप्पांचा हा गोषवारा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर टीका-टिप्पणी केल्याने अयोध्येतील भूमिपूजनावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. याबद्दल छेडले असता पाटील म्हणाले की, गेले चार महिने केंद्र सरकार कोरोनाच्या विषाणूशी सामना करत आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज सर्वसामान्यांसाठी दिले आहे. तसेच दीड लाख कोटी रुपये कोरोनाच्या लढाईसाठी खर्च केले आहेत. पीपीई किटपासून ते व्हेंटिलेटरपर्यंत कोठेही कमतरता होऊ नये म्हणून पंतप्रधान जातीने लक्ष ठेवून आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने भूमिपूजन होत असताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून शरद पवार दुटप्पी भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले.

कोरोनाच्या भीषण संकटात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याइतके भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोत्या मनोवृत्तीचे नाही. या सरकारमध्येच अंतर्गत बेबनाव असल्याने हे सरकार अल्पकाळाचेच आहे, सरकार पाडण्यासाठी “ऑपरेशन लोटस’ची गरज नाही. कर्नाटक, मध्य प्रदेश, आणि सध्या राजस्थानमध्ये सुरू असलेले सत्तानाट्य म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’ असे म्हणणे अन्यायकारक आहे. सध्या महाराष्ट्रातीलही आघाडी सरकारातील अनेक आमदार नाराज आहेत. नेतृत्वाच्या कार्यशैलीबाबत प्रश्न उपस्थित करीत आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेतील काही आमदारांना आपल्या पक्षाला सत्तास्थानात योग्य तो हिस्सा मिळत नसल्याची खंत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात महाराष्ट्रातही सत्ताबदल झाल्यास आश्चर्य वाटू नये, असे पाटील म्हणाले.

पवारांनी शिवसेेनेचे ५६ आमदार पळवले

सद्य:स्थितीत भाजप आमदार पळवत असल्याची टीका सत्ताधारी आघाडी सरकारकडून केली जात असली तरी आमचा अत्यंत जवळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे ५६ आमदार शरद पवारांनी पळवले, याबाबत मात्र ते चकार शब्दही काढत नाहीत. सत्तेवर येण्याचा महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला कौल दिला होता. परंतु शरद पवारांच्या ‘चाणक्य’ भूमिकेमुळे आम्हाला विरोधी पक्षात बसावे लागले आहे, असे पाटील यांनी सांगितले.