आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूरचे प्रश्न सोडवायला उशीर झाला असेल पण अजून सरकार आहे, येथे लोकप्रतिनिधींशी बोलून मी लक्ष घालेन, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. शहराच्या प्रश्नांवर भाजप लोकप्रतिनिधी एकत्र येत नसल्याची बाब पत्रकारांनी बावनकुळे यांच्या लक्षात आणून दिली त्यावेळी तेथे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख हे बावनकुळे यांच्या बाजूलाच बसलेले होते. दरम्यान, भारतीय जनता पक्ष आता जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष नेमणार आहे. तसेच बूथनिहाय तयारी केली जात असल्याची माहिती दिली.
गुरुवारी रात्री सोलापूर दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी शुक्रवारी सकाळी शिवस्मारक सभागृहात पत्रकार परिषद घेतली. विविध उपक्रम आणि निवडणूक तयारीची माहिती दिली. या दौऱ्यात त्यांनी शहर उत्तर, सोलापूर दक्षिण व शहर मध्य या तिन्ही विधानसभा मतदार संघात कार्यक्रम घेतले. उद्योजकांशी संवाद साधला. बूथ मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दुपारी सामाजिक एकत्रीकरण बैठकीस हजेरी लावली.
नेत्यांना उपरणे देऊन दिला भाजपात प्रवेश
भाजप शहर आणि ग्रामीण जिल्हा आयोजित महाबैठकीस सायंकाळी हेरिटेज लॉन येथे श्री. बावनकुळे यांनी संबोधित केले. यावेळी सिद्धाराम खजुरगी, मन्सूर गांधी, दक्षिण सोलापूर काँग्रेसचे पंकज पाटील, माजी उपमहापौर राजेश काळे यांचा भाजप पक्ष प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.
प्रत्येक बूथवर असेल ३१ जणांची कार्यकारिणी
भारतीय जनता पक्षाने बूथ सशक्तीकरण प्रवास अभियान सुरू केले आहे. सरकारच्या योजनांचा प्रचार केला जाईल. ज्यांना लाभ झालाय त्यांच्याशी संवाद साधणार. प्रत्येक बूथवर लोक जोडण्याचे अभियान सुरू केले आहे. एका बूथवर ३१ जणांची कार्यकारणी असेल. प्रत्येक बुथवर २५ जणांचा प्रवेश करून घेतला जाईल. येत्या डिसेंबरपर्यंत ही सर्व मोहीम पूर्ण होईल.
अजित पवारांना त्यांचे नेतेच डॅमेज करताहेत
शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा कोणीही मागितला नव्हता तरी त्यांनी दिला. त्यांनीच मागे घेतला. या वयात त्यांनी सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्याकडे नव्याने नेतृत्व द्यायला हवे. नव्या लोकांना त्यांनी संधी द्यायला हवी होती. अजित पवारांना महाविकास आघाडीचे नेतेच डॅमेज करत आहेत, असे ते म्हणाले.
सोलापूरच्या प्रश्नावर झाले निरुत्तर
भाजपचे लोकप्रतिनिधी एकत्र न अल्याने शहरात विकास झाला नाही, असा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर बावनकुळे हे अधिक बोलू शकले नाहीत. ते म्हणाले, ‘राहिलेले प्रश्न लोकप्रतिनिधींशी बोलून मार्गी लागतील असे बघतो’. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे व्यासपीठावर होते.
जिल्ह्यात आता दोन जिल्हाध्यक्ष असतील
सोलापूर जिल्ह्यात आता दोन जिल्हाध्यक्ष नेमले जाणार आहेत. त्यात एक पूर्व सोलापूर आणि दुसरा पश्चिम सोलापूर, अशा पद्धतीने सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची विभागणी करण्यात आली आहे. शहर व जिल्हाध्यक्षांच्या निवडी येत्या १५ ते २० मे दरम्यान पूर्ण होतील. ज्या ठिकाणी शहर आणि जिल्हाध्यक्ष बदलायचे आहेत त्याबाबत निर्णय घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.