आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चीनचे राजदूत कोटणीस स्मारकात माओंचे पत्र ठेवणार ; आज दुपारी कार्यक्रम होणार

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थोर आंतरराष्ट्रीय मानवतावादी डाॅ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकास मंगळवारी चीनचे राजदूत सन विडांग भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते क्रांतिकारक नेते माओ त्से तुंग यांच्या अक्षरातील शोकसंदेशाचे पत्र सुरक्षित पेटीत ठेवण्यात येणार आहे.डाॅ. कोटणीस स्मारक येथे दुपारी तीन वाजता राजदूतांसह १० जणांचे पथक येणार आहे. त्यापूर्वी चिनी राजदूताचे प्रतिनिधी मंडळाने डाॅ. कोटणीस स्मारकास सोमवारी भेट दिली. स्मारकात स्वच्छता, बंद पडलेले दिवे, स्वच्छता करण्यात आले. चीनचे राजदूत पुण्याहून मंगळवारी सोलापुरात येतील. दुपारी तीन वाजता डाॅ. कोटणीस स्मारकाची पाहणी करतील. डाॅ. कोटणीसांच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतील.

...अन् पेटीची चावी हरवली
माओ त्से तुंग यांच्या हस्ताक्षरातील शोकसंदेश पत्राचे आगळे महत्त्व चीनला वाटते. ते खूप जीर्ण झाल्याने २०१७ मध्ये दोन चिनी तज्ज्ञांनी सोलापुरात राहून त्या पत्राचा जीर्णोद्धार केला. तसेच ते पत्र कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी चीन सरकारने खास काचेची पेटी महापालिकेला तयार करून दिली होती. मात्र महापालिकेकडून तिची चावी हरवली. ती नव्याने करून घेण्यात आली आहे. त्यात शोकसंदेशाचे पत्र ठेवण्यात येणार आहे. याची तयारी झाली असल्याचे स्मारकाचे व्यवस्थापक प्रदीप जोशी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

कुटुंबीयांना पाठवलेले शोकसंदेश १९४२चे
चीन-जापान युद्धात भारतातून वैद्यकीय मदत पथक गेले होते. त्यात डाॅ. कोटणीस यांचा समावेश आहे. चिनी सैनिकांचा इलाज करत असताना त्यांचे वयाच्या ३२ व्या वर्षी चीनमध्ये निधन झाले. त्यांच्या सोलापुरातील कुटुंबीयांना त्यावेळी क्रांती नेते माओ त्से तुंग यांनी चिनी भाषेत शोकसंदेश पाठवला होता. भाताच्या गवतापासून बनवलेल्या तीन फुटी कागदावर त्यांनी तो स्वहस्ताक्षरात लिहिला. ते पत्र २९ डिसेंबर १९४२चे आहे.

माओ यांनी लिहिले, देशाने एक मित्र गमावला
‘‘डॉ. कोटणीस, आमचे भारतीय मित्र, आमच्या प्रतिकार युद्धात आम्हाला मदत करण्यासाठी दूरवरून चीनला आले. त्यांनी येनान आणि उत्तर चीनमध्ये पाच वर्षे काम केले. आमच्या जखमी सैनिकांना वैद्यकीय उपचार दिले. सततच्या अतिश्रमाने ते आजारी पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. सैन्याने मदतीचा हात गमावला आणि देशाने एक मित्र गमावला. त्याची आंतरराष्ट्रीय भावना आपण नेहमी लक्षात ठेवूया.’’

बातम्या आणखी आहेत...