आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवासी डाॅक्टरांचा राज्यव्यापी संप:सोलापूरचे डॉक्टरही संपात सहभागी, रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा दिली

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना, मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामध्ये सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टराही संपात सहभागी झालेले आहेत. गरजू रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून अतिदक्षता विभाग, कोविड वार्ड व प्रसूती विभागात व तात्काळ शस्त्रक्रिया सुुरू ठेवल्या आहेत. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास कटारे यांनी दिली.

मार्ड संघटनेचे सर्व पदाधिकारी सकाळी ओपीडीच्या वेळेत सर्वजण बी ब्लॉक समोरील पोर्चमध्ये जमले होते. बाह्य रुग्ण विभागात जावून सेवा देण्याऐवजी प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करीत होते.

सिव्हिलमधील 210 निवासी डॉक्टरांनी संपात सहभागी नोंदवला आहे. गरजू रुग्णांच्या आरोग्याची काळजी महत्चाची आहे. यासाठी निवासी डॉक्टरांपैकी 30 ते 40 टक्के डॉक्टर आयसीयू, कोविड वार्ड, लेबर वार्डात सेवा देत आहेत.निवासी डॉक्टरांच्या समस्या मांडून शासन व प्रशासनास माहिती करुन प्रयत्न केला.

ज्यामध्ये राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण मंत्री, सचिव,आयुक्त व संचालक यांच्यासोबत संघटनेच्या अनेकदा बैठक झाल्या.मात्र कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. तरी उद्यापासून शासन स्तरावर योग्य तो निर्णय घेतला नाही तर संपाची तीव्रता वाढवण्यात येणार आहे.

या आहेत मागण्या

राज्यातील सर्व शासकीय किंवा पालिका महाविद्यालयात अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432 जागांची पदनिर्मिती याचा प्रस्ताव शासन दरबारी रखडत पडला आहे. यामुळे निवासी डॉक्टरांचे भविष्य ताटकळत आहे. बंदपत्रीत सेवेचे थोतांड तरी कशाला? सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरावीत. यामुळे निवासी डॉक्टरांचे व पदवी पूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कधी थांबणार? 16 ऑक्टोबर 2018 प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तात्काळ आदा करण्यात यावा. सध्या वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करुन सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करुन राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत वरिष्ठ निवासी डॉक्टरांना न्याय द्यावा.

''सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मात्र इर्मजन्सी सेवा देत आहेत. प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,आंतरवासिता डॉक्टरांना ओपीडी व वार्डामध्ये सेवा देण्यासाठी तैनात आहेत. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. आज फक्त तात्काळ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.'' - डॉ. रोहन खैराटकर, वैद्यकीय अधिक्षक सिव्हिल हॉस्पिटल.

बातम्या आणखी आहेत...