आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उशिरा जाग:दोन्ही पाळ्यांत धावणार घंटागाड्या; कचरा संकलनात महापालिकेची यंत्रणा तोकडी पडू लागली

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कचरा संकलन आवाक्यात येत नसल्याने दोन्ही पाळ्यांत घंटागाड्या पाठवण्याची तयारी महापालिकेने केली आहे. शहरात कचरा संकलनपोटी महापालिकेने प्रत्येक घरास दरवर्षी ६०० तर दुकानास १२०० रुपये उपविधी कर लावला. नागरिकांनी पैसे भरूनही रोज घंटागाडी येत नसल्याने हद्दवाढ भागात हळूहळू कचरा साचत लागला. त्यामुळे महापालिकेने दोन्ही पाळ्यांत घंटागाड्या पाठवण्याचे नियोजन सुरू केले आहे. घनकचरा विभागाने त्याचा आराखडाही तयार केला आहे.

महापालिकेने यापूर्वी २०१८ मध्ये आराखडा केला. चार वर्षांत मिळकती वाढल्याने कचरा संकलनात अडचणी येऊ लागल्या. कमी वाहने असल्याने दोन सत्रांत घंटागाड्यांद्वारे काम केल्यास कचरा संकलन आवाक्यात येणार आहे. शहरात रोज घंटागाड्या पाठवून कचरा संकलन करण्यात येते. हद्दवाढ भागातील भाैगोलिक रचना पाहता असलेल्या १९० घंटागाड्यांतून रोज गाड्या पाठवणे शक्य होत नाही. त्यामुळे हद्दवाढ भागात दिवसाआड घंटागाड्या जात आहेत.

शहरातील मिळकती आणि घंटागाड्यांची संख्या पाहता ५० घंटागाड्या कमी पडत आहेत. त्यामुळे घनकचरा विभागाने नव्याने आराखडा तयार केला आणि दोन सत्रांत घंटागाड्या पाठवण्याचे नियोजन केले. सकाळच्या सत्रात १७० तर दुपारच्या सत्रात ४० ते ५० घंटागाड्या पाठवल्यास प्रत्येक घंटागाडीस रोज १२०० घरांचे नियोजन करता येईल. त्यामुळे कचरा संकलन करणे साेयीचे होईल. त्यानुसार नियाेजन करण्यात येत आहे.

सफाईपट्टीचे ४ कोटी रुपये दुसऱ्यास कामाला
शहरात सफाईपट्टी व युजर चार्ज असताना महापालिकेने प्रतिवर्षी घरासाठी ६०० तर दुकानासाठी १२०० रुपये उपविधी कर लावला आहे. त्यातून पालिकेस दरवर्षी ४ कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. या रकमेचा वापर शहरातील सफाई कामासाठी न होता दुसऱ्याच कामास होत आहे.

आर्थिक चणचण भासण्याची शक्यता
कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेला भविष्यकाळात आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी पालिकेच्या १५ वे वित्त आयोगातील रक्कम स्मार्ट सिटी हिश्श्यापोटी महापालिकेने वर्ग केले. त्यामुळे दैनंदिन कामासाठी डिझेल, कर्मचारी वेतन, गाड्यांची देखभाल व दुरुस्ती यासाठी चणचण भासू शकते.

पालिकेच्या दारातच कचरा
महापालिकेच्या प्रवेशद्वारसमोर सुका कचरा साचून ढीग तयार झाला आहे. तेथे असलेल्या बादलीत पादचाऱ्यांनी कचरा टाकणे अपेक्षित आहे. पण नागरिकांनी बाजूला कचरा फेकून दिला आहे. पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा दिसत आहे.

विडी घरकुल, जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागात साचतोय कचरा
विडी घरकुल, जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागातील दाट लोकवस्तीत हळूहळू कचरा साचत असल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यापूर्वीचे आणि आताचे कचरा संकलन पाहता सुमारे २० ते ३० टनाचा फरक दिसून येत आहे.

तयार होतोय आराखडा
शहरात कचरा साच्ू नये म्हणून हद्दवाढ भागात दोन पाळ्यात घंटागाडी पाठवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचा आराखडा घनकचरा विभागाकडून करण्यात येत आहे.''-शीतल तेली उगले, पालिका आयुक्त

बातम्या आणखी आहेत...