आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री कक्ष:जनप्रश्न निवारण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी असतील प्रमुख

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपले सरकार पोर्टल, लोकशाही दिन असूनही नागरिकांच्या तक्रारी सुटत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आता मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

या कक्षाचे प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी तर त्यांच्या मदतीला नायब तहसीलदार व एक लिपीक यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. अद्याप तरी एकाही जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री कक्ष सुरू करण्यात आले नाही, पण लवकरच ते सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून व परिणामकारक निपटारा होण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री कक्ष त्वरित सुरू करावे. उपलब्ध अधिकारी-कर्मचारी यांच्यातून मुख्यमंत्री कक्षासाठी सेवा वर्ग कराव्यात. यामध्ये पुरवठा विभागाच्या नवीन सुधारित आकृतीबंधानुसार अतिरिक्त अधिकारी कर्मचारी वा करमणूक कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंंत्री कक्ष सुरू होण्याच्या आधीच सोलापूर जिल्ह्यात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वतंत्र पालकमंत्री कार्यालय सुरू केले पण या कार्यालयाकडे फारशा तक्रारी येत नाहीत. यासाठी स्वतंत्र तहसीलदार व लिपीक कर्मचारी नियुक्त केले आहेत.

असे चालेल कामकाज

मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे कामकाज कसे असावे ? याबाबतही शासनाने सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री यांना दिलेले अर्ज, निवेदन तक्रारी स्वीकाराव्यात. त्याची पोचपावती नागरिकांना द्यावी. या प्रकरणावर जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखाकडे वर्ग करून त्यावर तातडीने कार्यवाही करावी.

या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी. त्याचा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री सचिवालयास दर महिन्याच्या १० तारखेपूर्वी सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...