आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेगाव रोडवरील सीएनएस हॉस्पिटल येथे कोरोना काळात निकृष्ट दर्जाचा ऑक्सिजन प्लांट लावून रुग्णालयाची ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायाधीश राठोड यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.
निकेश सावरकर, केदार नायगावकर (रा. पुणे) यांना पोलिस कोठडी मिळाली आहे. स्वाती सुरेश बावनकर (पुणे) यांचा शोध सुरू आहे. हॉस्पिटलचे व्यवस्थापक संदीप भारत पाटील यांनी सलगरवस्ती पोलिसात ३१ मार्च रोजी रात्री फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ एप्रिल २०२१ पासून घडला आहे.
कोरोना कालावधीत सीएनएस हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचाराकरिता ऑक्सिजन प्लांटची गरज होती. त्यानुसार औंध पुणे येथील ऑकॅस लाइफ सायन्सेस या मेडिकल गॅस व केमिकल कंपनीचे कोटेशन आले होते. त्यानुसार त्यांची टीम हॉस्पिटलमध्ये येऊन प्लांट इन्स्टॉल करून देणार होते. ८० लाखांत प्लांट खरेदी करण्यात आला. २८ एप्रिल २०२१ रोजी ५०० एलपीएम क्षमतेचा पूर्णपणे ऑटोमॅटिक प्लांट होता. २२ जून २०२१ रोजी तयार झाला. फक्त पंधरा ते वीस मिनिटे चालू करून दाखविला होता. पूर्ण चाचणी झाली नाही. त्यानंतर तीन युनिट चालू ठेवून पाहणी करण्यात आली. दरम्यान, अचानक प्रेशर व प्युरिटी खालावली.
याबाबत सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे फौजदार सचिन मंद्रूपकर यांना विचारले असता, निकृष्ट दर्जाचे प्लांट बसवून फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारीची नोंद घेण्यात आली आहे. शुक्रवारी निकेश सावरकर आणि केदार नायगावकर या दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणात बावनकर यांचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. संजय देवमाने यांनी काम पाहिले.
प्लांटमधील ऑक्सिजन नाही रुग्णांच्या उपयोगाचा
प्लांटमधील ऑक्सिजन रुग्णाच्या उपचारासाठी उपयोगी नसल्याचे, प्रेशर कमी असल्याचे समोर आले. मशीनदेखील आपोआप बंद होत असल्याचे लक्षात आले. त्यांना हॉस्पिटलने संपर्क साधला असता अद्याप ते दुरुस्त करून दिले नाही. त्यामुळे ऑकॅस लाइफ सायन्सेस, मेडिकल गॅस व केमिकल कंपनीच्या प्रमुख स्वाती सुरेश बावनकर, मॅनेजिंग असोसिएट सावरकर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर नायगावकर यांनी हॉस्पिटलमध्ये निकृष्ट दर्जाचे प्लांट बसवून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.