आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा निम्माच पाऊस:गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस, चिंता वाढली; यंदा मात्र पाऊस लांबणीवर पडला आहे

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये मागील १५ दिवसांमध्ये ४०.९० मिलिमीटरपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली आहे. केवळ शहरालगतच्या दक्षिण सोलापूरमध्ये ५१.४० मि.मी, अक्कलकोटमध्ये ५४.८० मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोलापूर जिल्ह्यात ५० टक्के कमी पावसाची नोंद जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झाली आहे.

बहुचर्चित मान्सून राज्यात दाखल झाला. पण, अद्याप मनसोक्त हजेरी मात्र लावली नाही. ८ जूनपासून मृग नक्षत्राची सुरुवात झाली. पण काही ठरावीक भागामध्ये पाऊस झाला. पण इतरत्र मात्र नुसतेच ढग येतात अन् वादळामुळे तेही पुढे विरून जातात.

जिल्ह्याच्या ठरावीक तालुक्यातच मान्सूनचा पाऊस झाला आहे. उर्वरित तालुक्यांकडे मात्र पावसाने पाठ फिरवल्याने चिंता वाढली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षींच्या तुलनेत ५० मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी (सन २०२१) जूनअखेरपर्यंत ८५.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र १ ते १५ जूनअखेरपर्यंत फक्त ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये अद्याप निम्माच पाऊस झाला आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यात जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र पाऊस लांबणीवर पडला आहे. जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये कमी-अधिक पाऊस झाला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जमिनीमध्ये चांगली ओल झाल्यापासून खरिपाची पेरणी करून नका, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...