आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआषाढी वारी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूर वारकऱ्यांना सर्व नागरी सुविधा पुरवा. शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती, नगर प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार घाट ते घाट चौक, नामदेव पायरी यासह शहरातील रस्त्यांवरील खड्डे, पॅचेस बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. दरम्यान जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पालखी मार्गावर कोरोना चाचणी व विलगीकरण कक्ष उभारण्याची सूचना केली आहे.
नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाबाबत संबंधित विभागाची आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालखी मुक्काम ठिकाणे, विसावा ठिकाणावर मुरमीकरणाचे काम त्वरित करून घ्यावे. पाणीपुरवठ्यासाठी स्त्रोत निश्चित केले आहेत. महावितरणने त्याठिकाणी वारी कालावधीपुरते डीपी बसवून द्यावेत. ग्रामीण भागासाठी सहा तर नगर परिषद हद्दीमध्ये १५ टॅँकरची सोय केली असून ६३ पाण्यांचे स्त्रोत राखून ठेवण्यात येणार आहेत, शहरातील ११० कूपनलिकांचे थकीत वीज बिल भरण्यासाठी २८ लाखांची तरतूद केली. ६५ एकर, पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. याठिकाणी मुबलक प्रमाणात तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करावी. शौचालय स्वच्छतेसाठी सक्षम यंत्रणा उभी करावी, नियमित पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महिलांसाठी शौचालयांची स्वतंत्र सुविधा असणार
कोरोनाची दक्षता घेण्यासाठी पालखी मार्गावर विलगीकरण, तपासणी कक्ष उभारण्यात येणार आहे. पालखी मार्गावर माता-बालक कक्षाची उभारण्यात येतील. महिलांसाठी शौचालयांची स्वतंत्र सुविधा असेल. भाविकांच्या सेवेसाठी शासकीय आदेशाची वाट पाहू नका, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दिल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.