आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर:विठ्ठल मंदिरावरील भोंगे सुरू ठेवा, पंढरीतील मुस्लिम समाजाची मागणी

सोलापुर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरावरील भोंगे बंद केले असले तरीही खास बाब म्हणून सरकारने परवानगी द्यावी. तसेच विठ्ठल मंदिरावरील भोंगे सुरू व्हावेत, अशी मागणी शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी पत्रकारांशी बोलताना केली. मंदिरातील काकड आरती भोंग्यावरून पुन्हा ऐकायला मिळावी, असे त्यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुठल्याही धार्मिक स्थळी रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यास मनाई आहे. मात्र, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची काकड आरती पहाटे पाच वाजता होते. न्यायालयीन आदेशाचा भंग होत असल्याने गुरुवारपासून मंदिर समितीने भोंगे बंद केले आहेत. या काकड आरतीला हजारो भाविक मंदिर परिसरात असतात. परंतु आता काकड आरती ध्वनिक्षेपकावर होणार नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम समाजाने विशेष बाब म्हणून विठ्ठल रुक्मिणीची काकड आरती ध्वनिक्षेपकावर सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर, मशिदींवरील सर्व भोंगे बंद झाले तरी चालतील, पण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील काकड आरती सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.

आम्ही रोज काकड आरती ऐकतो
पंढरपूर हे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे. आम्ही दररोज सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची काकड आरती ऐकतो. आता काकड आरती ध्वनिक्षेपकावर होणार नाही. मंदिर समितीने परवानगी घेऊन दररोज काकड आरती ध्वनिक्षेपकावर सुरू ठेवावी. सरकारने परवानगी द्यावी. अहमद काझी, नागरिक, पंढरपूर.

बातम्या आणखी आहेत...