आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार, स्मशानभूमीतच मुक्काम; पंढरपूरातील तरुणाचा पुढाकार

महेश भंडारकवठेकर | पंढरपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी महापुरातही सुरज राठी या तरुणाने केली होती मदत

पंढपूरचा २२ वर्षीय सूरज राठी हा तरुण कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता आवश्यक खबरदारी घेत येथील स्मशानभूमीत आलेल्या मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी मदत करत आहे. १५ दिवसांपासून त्याचा स्मशानातच मुक्काम आहे. तो रात्रंदिवस अंत्यसंस्कारासाठी सेवा देत आहे. त्याच्या या कार्याची शहरासह राज्यभरातील मान्यवरांनी दखल घेत कौतुक केले आहे.

वाहन चालक असलेला सूरज हा एका दुकानात हमालीचेही काम करतो. शहरातील महापुराच्या काळात आणि गतवर्षीही कोरोना काळात त्याने लोकांना मदतीचा हात दिला होता. महापूराच्या थैमानात तो नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात अग्रेसर होता. अंत्यसंस्कारासाठी मदतीमुळे आपल्या आई-वडिलांना त्रास होऊ नये यासाठी त्याने वैकुंठ स्मशानभूमीतच मुक्काम ठोकला आहे. सामाजिक बांधिलकीतून तो पालिका कर्मचाऱ्यांना कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी मदत करत आहे.

शहरातील रुग्णालयांमध्ये त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील कर्मचारी त्याला संपर्क साधतात. बुधवारी शहरातील एका वृद्धेचा कोरोनासदृश्य आजाराने मृत्यू झाला. तिचे कुटुंब खूप मोठे आहे. मात्र, तिच्यावर अंत्यसंस्कार करताना कुटुंबीयांत भीतीचे वातावरण होते. तेथील नगरसेवक अनिल अभंगराव, सामाजिक कार्यकर्ते राहुल परचंडे यांनी सूरजशी संपर्क करून तिच्या मृत्यूची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता त्याने पीपीई किट परिधान करून मृताच्या घरी दाखल झाला. तिरडी बांधून वृद्धेचा मृतदेह घरातून बाहेर उचलून आणून त्यावर ठेवला. अंत्यविधीसाठी पार्थिव स्मशानभूमीत नेण्यास मदत केली. पंढरपूरच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर तिसऱ्याच दिवशी तब्बल २८ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आले होते.

त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना मन हेलावले होते. मात्र, त्यानंतर स्मशानभूमीत मृतदेह येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सूरजने सांगितले. सूरजच्या या कामाची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन शुगर्सचे अध्यक्ष उमेश परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालकेंनी घेतली आहे.

कोरोनाचे संकट लवकरच जाऊ दे
भीतीपोटी मृतांवर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकही धजावत नाहीत. अशा वेळी सूरज स्मशानभूमीत मृतदेहाला प्लास्टिक पॅकिंग काढून कुटुंबीयांना शेवटचे दर्शन घडवतो. ठराविक अंतरावरून मृताला शेवटचे पाणी पाजण्याची विधीही तो उपलब्ध करुन देतो. कोरोना लवकर संपू दे, आपल्याला हे काम करावे लागू नये. प्रसिद्धीसाठी आपण हे काम करीत नाही. आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे सेवाभावनेने हे पुण्याचे काम करत असल्याचे सूरजने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...