आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेराेना इफेक्ट:चहाचा चटका; राज्यात किलोमागे 100 रु.महाग, विक्रीत 45% घट, देशात चहाचे उत्पादन 50 दशलक्ष किलोने घटले

साेलापूर / मनाेज व्हटकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात रोज 100 ते 120 टन चहापत्तीची विक्री हाेते

शरीराचा थकवा घालवण्यासाठी उत्साहवर्धक पेय असलेल्या चहाच्या उत्पादनालाच थकवा आला आहे. किमती वाढत चालल्याने सर्वसामान्यांनाही चहा महागाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. चहा मळ्यांना काेराेना महामारीचा माेठा फटका बसला आहे. त्यामुळे चहाचे उत्पादन ५० दशलक्ष किलाेने घटले आहे. ठाेक विक्रीच्या दरात किलोमागे १०० रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कोरोना संसर्गामुळे राज्यातील चहा विक्री व व्यवसायावर ४० ते ४५ टक्के परिणाम झाला आहे. देशात नवीन चहाचे उत्पादन मार्च, एप्रिल महिन्यात सुरू हाेते. याच काळात काेराेनाचा कहर सुरू झाला आणि त्याचा फटका चहा व्यवसायाला बसला. नॅशनल टी बाेर्डाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिलमध्ये देशात चहापत्तीचे उत्पादन १८८.१० दशलक्ष किलाे होते. यंदा ते ११३.३६ दशलक्ष किलाेवर आले. साधारण ४० ते ४५ टक्के उत्पादन घटले आहे. लाॅकडाऊन, बंद उद्योग, घरी परतलेले मजूर, ठप्प वाहतूक व्यवस्था या सर्वांचा परिणाम चहा व्यवसायावर झाला आहे. अजूनही काेराेना महामारीचे संकट कायम आहे. नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे चहाच्या मळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे चहाचा कमी पुरवठा, कमी साठा व मागणीत वाढ यामुळे किमती वाढताहेत.

किंमत वाढत जाणार : भारतात गुवाहाटी, सिलिगुडी, दार्जीलिंग, कोलकाता, उटी येथे चहापत्तीचे प्रामुख्याने उत्पादन हाेते. परंतु तेथेच अडचणी निर्माण झाल्याने चहाच्या किमती किलोमागे १०० रुपयांनी वाढल्या आहेत. समाधानाची बाब म्हणजे सध्या रिटेल बाजारात जुन्या दराची चहापत्ती उपलब्ध आहे. पण तरीही हा साठाही फार नाही. दार्जीलिंग किंवा अन्य कुठेही चहा खरेदीसाठी किलाेमागे २०० ते २२० रुपये मूळ किंमत असते. त्यात चहाच्या प्रतिकिलाेला वाहतुकीसाठी दहा, जीएसटी सहा रुपये, पॅकेजिंग किंवा इतर खर्च ३० रुपये, गाेदाम खर्च आहेच. त्यामुळे चहाच्या किमती वाढ हाेत आहे.

राज्यात राेज १२० टन खप
राज्यात रोज १०० ते १२० टन चहापत्तीची विक्री हाेते. साेलापुरात पाच ते सात टन विक्री हाेते. शहरात १० प्रमुख विक्रेते आहेत. सध्या लाॅकडाऊनमुळे हाॅटेल, लॉज बंद असल्याचाही परिणाम झाला आहे. साधारणत: हाेलसेल मार्केटमध्ये तीन प्रकारच्या दर्जाची चहापत्ती विकली जाते. चहापत्तीचे रिटेलमध्ये माेठे मार्केट आहे. तुलनेत हाेलसेल विक्रेत्यांची संख्या कमी आहे. चहापत्ती उत्पादनावर जीएसटी ५ टक्के तर एक टक्का स्थानिक उलाढालीवर जीएसटी द्यावा लागताे.

चहासाठी हे वर्ष वाया गेल्यासारखेच
चहा व्यवसायासाठी वर्ष वाया गेल्यासारखेच आहे. चहा उत्पादन दरवर्षी डिसेंबरमध्ये बंद करायचा नियम आहे. उत्पादन पुन्हा जानेवारीत सुरू हाेते. यंदा ते बंद करू नका, अशी मागणी केंद्र सरकारच्या नॅशनल टी बाेर्डाकडे राष्ट्रीय टी मर्चंट असाेसिएशनने केली आहे. - दीपक आहुजा, (सचिव टी मर्चंट असोसिशन, साेलापूर)

बातम्या आणखी आहेत...