आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:नाक्यावरील कर्मचाऱ्यांची वामकुक्षी; शेजारच्या राज्यातून बिनधास्त येतात लोक, मग कशी तुटणार साखळी

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र हद्दीतील तपासणी नाक्यावरील कर्मचारी झाडाच्या सावलीत पिक्चर पाहात घेतात वामकुक्षी.

कोरोनाचा प्रादुर्भाव थोपवण्यासाठी शासन कडक निर्बंध लावत आहे. ‘ब्रेक दे चेन’बाबत प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे चित्र, महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर आहे. कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांमध्ये जास्त प्रवासी नको. ऑक्सिजनचे प्रमाण, ताप व इतर लक्षणे नसल्याची खातरजमा करण्यासाठी पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले. पण प्रत्यक्षात तपासणी नाक्यावरील पोलिस होमगार्डवर जबाबदारी सोपवून गायब आहेत. होमगार्ड, आरोग्य विभागाचा कर्मचारी वाहन तपासणीऐवजी झाडाखाली मोबाइलवर पिक्चर पाहात अथवा वामकुक्षी घेत असल्याचे चित्र बुधवारी (दि. २१) सकाळी साडेअकरा ते दुपारी दीडपर्यंत दिसले.

दक्षिण सोलापूर, मंगळवेढा व अक्कलकोट या तालुक्यांतील सीमेवर पोलिस व आरोग्य विभागाचे विशेष पथक आहे. जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १२ ठिकाणी तपासणी पथके आहेत. बुधवारी नांदणी (दक्षिण सोलापूर) येथील नाक्यावर एक पोलिस, दोन होमगार्ड होते. वाहनांच्या तपासणीऐवजी झाडाखाली त्यांची गप्पांची मैफल रंगली होती. त्यात आरोग्य सेवक सहभागी होते. दुपारी बारा वाजता एका दुचाकी स्वारासमवेत पोलिस निघून गेले. त्यानंतर होमगार्ड व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जेवण करून झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी आडवे झाले.

लोकांची तपासणी केली, नावेही नोंदवली : आरोग्य सेवक कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक एस. व्ही. शिंदे यांची नांदणी तपासणी नाक्यावर नियुक्ती आहे. त्यांच्याकडे टेम्परेचर गन, ऑक्सिमीटरही नव्हते. त्याबाबत विचारले असता, मी विसरलो आहे, उद्या नक्की घेऊन येतो, असे धक्कादायक उत्तर दिले. वाहनातील लोकांची तपासणी केली? ती कशा पद्धतीने केली? यावर बोलताना, हो लोकांना पाहून तपासले, त्यांची नावे नोंदवली आहे, अशी उत्तरे त्यांनी दिली.

प्रशासनाची कडक भूमिका, स्वॅब चाचणी करून पुढे प्रवेश धुळखेड येथे कर्नाटक पोलिस व आरोग्य विभागाने तपासणी नाका उभारला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनास थांबवून लोकांची स्वॅब चाचणी करतात. अहवाल निगेटिव्ह असेल तरच पुढे जाऊ दिले जाते. महाराष्ट्रात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असल्याने येथील लोकांची विशेष तपासणी करतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या कर्नाटकी लोकांची चाचणी सक्तीने करण्यात येत आहे. स्वॅब घेण्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र कक्ष उभारला आहे.

समन्वय अधिकाऱ्याकडे एेकीव माहिती सीमा नाक्यावर पोलिस व आरोग्य कर्मचारी आहेत. फक्त ऑक्सिमीटर, टेम्परेचर पाहिले जाते. ते कामकाज कसे होते हे मी पाहिले. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलिस नियुक्त झाल्यावर वाहने थांबतील. मग तपासणी होईल, असे झेडपीचे समाजकल्याण अधिकारी तथा सीमा तपासणी पथकाचे समन्वयक संतोष जाधव यांनी सांगितले.

होमगार्डवर जबाबदारी सोपवून पोलिस गायब, कुणी विचारणारेच नसल्याने कर्नाटकातून येतात वाहने बिनबोभाट धुळखेड (कर्नाटक) येथे महाराष्ट्रातून आलेली वाहन थांबवून लोकांची स्वॅब तपासणी होते. भर उन्हात कर्नाटक पोलिस रस्त्यावर उभे असतात.

प्रश्न: आरोग्य विभागाचे कर्मचारी कोण आहेत?
>मी, मी आहे की, एस. व्ही. शिंदे, आरोग्य सेवक आहे.

प्रश्न : कोणत्या आरोग्य केंद्राकडून आलात, किती तपासणी झाली?
>कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक. आज ३० लोकांची तपासणी केली.

प्रश्न : तपासणी कशी करता? स्वॅब घेता का?
>नाही, नाही, स्वॅब वगैरे काही नाही, असच सहज पाहून.

प्रश्न : ताप मोजण्याचे मशीन, ऑक्सिमीटर याद्वारे पाहता का?
> टेम्परेचर गन, ऑक्सिमीटर नाहीय, मी विसरलो, उद्यापासून घेऊन येतो की, आता असेच, लोकांना फक्त नावं विचारलीत.

प्रश्न : पोलिस कर्मचारी कोण आहेत काय?
>आम्ही, दोघे होमगार्ड आहोत. साहेब जेवायला म्हणून गेलेत. आम्ही घरातून डबा आणून जेवलो. थोडा आराम केला.

प्रश्न : वाहन तपासणी?
>करतो, कागदपत्रे पाहतो, दंड करतो. ते सगळे साहेब लोक करतात. आम्ही फक्त ते सांगतील तेवढे करतो.
कर्नाटक हद्दीत प्रत्येक वाहन थांबवले जाते, लोकांची स्वॅब तपासणी बंधनकारक.

बातम्या आणखी आहेत...