आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आगळा योद्धा:आई, पत्नी, तान्हुली कोरोना बाधित; मुलाला कारमध्ये सोबत घेऊन सेवा बजावतात पालिकेचे डॉ. पांडे

म. युसूफ शेख । सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई, पत्नी कोरोनाग्रस्त असल्यामुळे तीन वर्षीय चिमुकल्याला दिवसभर सोबत घेऊन सेवा बजावत आहेत डॉ. धनराज पांडे.
  • स्वत:ही होते पॉझिटिव्ह, पंधरा दिवसांत कोरोनावर यशस्वी मात

अवघ्या पंधरा दिवसांत स्वत: कोरोनावर मात केली, नंतर आई, पत्नी आणि एक वर्षाची तान्हुली मुलगी असे तिघे सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी संघर्ष करीत आहेत. घरात कोणीच नाही, मग काय करणार. तीन वर्षीय मुलाला दिवसभर आपल्यासोबत घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. धनराज पांडे हे सोलापूरकरांची सेवा करीत आहेत.

कोरोना कंट्रोल रुमचे समन्वय अधिकारी तथा स्थानिक निधी लेखा वित्त विभागाचे सहायक संचालक डॉ. धनराज पांडे हे लातूरचे. सोलापुरात येऊन त्यांना तीन ते साडेतीन वर्षे झाली आहेत. प्रशासनाने मोठ्या विश्वासाने पांडे यांच्यावर कोरोना कंट्रोल रूमची जबाबदारी सोपविली. पांडे यांनी सुद्धा ती जबाबदारी तेवढ्याच विश्वासाने पार पाडली आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. बिनधास्तपणे ग्राऊंड लेव्हलवर जाणे, पाहणी करणे, समस्या समजून घेणे आणि त्यानंतर सोडवणे ही त्यांची कार्यपद्धती. हे करत असतानाच त्यांना आणि त्यांच्या तीन वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली. पंधरा दिवस ते कुटुंबापासून लांब होते. ३० जून रोजी रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्या दोघांवर उपचार सुरू करण्यात आले. पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. घरी परतण्यापूर्वी त्यांच्या आई, पत्नी आणि एक वर्षांची चिमुकली या तिघांनाही कोरोनाने जखडले. १० जुलै रोजी त्यांना दवाखान्यामध्ये अॅडमिट करण्यात आले. तेव्हा पांडे हे आपल्या तीन वर्षांच्या विहान या मुलासोबत सोबत राहिले. घरात विश्रांती न घेता त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशीपासून ड्युटी जॉईन केली. इतकेच नाही तर त्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला सोबत घेऊन सकाळ ते सायंकाळपर्यंत ते आपली ड्युटी बजावत आहेत. खाण्याचे हाल होत आहेत, मुलाला सांभाळणारे कोणी नाही, तो सारखा मम्मी कुठे आहे आणि आजी कुठे आहे, अशी विचारणा करत आहे. अशा परिस्थितीत त्या मुलाची आई आणि बाबा म्हणून पांडे हे सांभाळ करून त्याला हाताने घास भरवत असतात, हे करत असतानाच अचानक वरिष्ठांचा फोन आला किंवा कुठेही काम आले की त्या मुलाला ड्रायव्हरच्या हाती सोपवून ते प्रथम आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्या या सेवेबद्दत सोलापूरकर त्यांना सलाम ठोकत आहेत.