आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्ह्यांमध्ये अग्नितांडव:बार्शीत फटाके कारखान्याला आग; 4 महिलांचा मृत्यू, 1 जखमी; तासभर रुग्णवाहिका आली नाही

सचिन ठाेंबरे, मल्लिकार्जुन धारूरकर | पांगरी, ता. बार्शीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • {आग लागताच कारखान्याचा मालक मुलासह पसार, सर्व कामगार महिलाच {घटना दुपारी २.३० वाजेची, सोलापूर जिल्हा प्रशासन सायंकाळी घटनास्थळी

शिराळे-पांगरी (ता. बार्शी) या गावांच्या सीमेवर एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये असलेला फटाक्यांचा कारखाना. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यातून माेठा स्फाेट झाला. आगीचे प्रचंड लाेळ उठले. त्यासरशी परिसरच हादरला. या आवाजाने परिसरातील तरुणांनी तिकडे धाव घेतली. कारखान्यात स्फाेटांची मालिकाच सुरू झालेली. पेटलेले कामगार जिवाच्या आकांताने आेरडत पळत सुटले. बाहेरच्या शेतात येऊन तडफडू लागले. तरुणांनी तातडीने अॅम्ब्युलन्सला संपर्क केला. पाेलिसांना कळवले. तासभर काेणाचाच पत्ता नाही. काळेठिक्कर मृतदेह शेतातच पडले होते. या आगीत ४ महिला कामगारांचा मृत्यू झाला. १ जखमी असून ५ महिला सुखरूपपणे बाहेर पडल्या. आग लागली त्यावेळी कारखान्यात मालक आणि १० कामगार हाेते. इकडे जखमींना मिळेल त्या वाहनांमध्ये घालून उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्याचे काम सुरू झाले. तेही स्थानिक तरुणांच्या मदतीने. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक पाेहाेचले ते सायंकाळी सव्वा चारलाच. ताेपर्यंत दाेनच पाण्याचे बंब आणि शर्थीचे प्रयत्न करणारे जवान हाेते. प्रत्यक्ष आग आणि पाण्याचा मारा यात जवळपास ५० फूटांचे अंतर हाेते. जवळ जाणे शक्यच नव्हते. कारण स्फाेट आणि आगीचे लाेळ सुरूच हाेते. क्षेपणास्त्र डागल्यानंतर लांबून ज्या प्रकारचे दृश्य दिसते, अगदी तशीच स्थिती. लांबून पाहात असलेल्या गर्दीमधून कामगारांच्या नातेवाईकांचा हंबरडा सुरू हाेता. ते घटनास्थळी धावून जाऊ नयेत म्हणून त्यांना धरून ठेवलेले हाेते. अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठाेंबरे, जिल्हा पाेलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सायंकाळी यंत्रणा हलवली. त्यानंतर साेलापूर शहरातून अग्निशामक दलाच्या दाेन गाड्या आणि मंगळवेढ्याहून एक असे तीन बंब घटनास्थळी धावून गेले. रात्री कारखान्यातून स्फाेटांचा आवाज आणि आगीचे लाेळ सुरूच हाेते. आग लागताच मालक व त्याचा मुलगा पसार झाले.

जेसीबी-दगडाच्या घर्षणाने ठिणगी उडाली : कारखान्याच्या पत्र्याच्या शेडपासून १५ फूट अंतरावर जेसीबीव्दारे खड्डे खणण्याचे काम सुरु होते. बाहेर फटाक्यांची रासायनिक पावडर वाळत टाकलेली होती. खड्डे खणताना जेसीबी आणि दगडाचे घर्षण झाल्याने ठिणगी उडल्याने आग लागल्याची शक्यता आहे

परवाना-नूतनीकरण नंतर तपासणार
^फटाका कारखान्याला परवाना होता का? त्याचे नूतनीकरण झाले हाेते का? सुरक्षा उपाय योजनांची साधने हाेती का? या सर्व बाबींची चाैकशी नंतर हाेईल. सध्या तर बचावकार्य, जखमींना वैद्यकीय मदत आणि मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई या गाेष्टींना प्राधान्य असेल.
- शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी

कारखान्यात दहा महिला कामावर हाेताे, मालक पळाले
कारखान्यात आम्ही दहा महिलाच काम करत हाेताे. मालक हाेते. दुपारी त्यांचा आवाज आला, ‘बाहेर पळा...’ काय झाले? असे विचारतच ते बाहेर पडले. ताेपर्यंत कारखान्याने पेट घेतलेला हाेता. कानठळ्या बसतील असा आवाज हाेता. तिथून बाहेर पडले, असे माेनिका भालेराव यांनी सांगितले.

स्फोटाचे कारण अस्पष्ट, मात्र विविध दोन शक्यता
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी त्याबाबत दोन कारणांची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाचे अयोग्य मिश्रण. ज्वलनशील पदार्थांचे प्रमाण जास्त झाले तर आग भडकू शकते. रसायन हलक्या दर्जाचे असले तरीही आग लागू शकते.

घटनास्थळ दूरवर असल्याने मदत पथके उशिरा पाेहोचली
सव्वाचारच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. कारखाना आडरानात असल्याने मदत पथके पाेहाेचण्यास उशीर झाला. आग विझविण्यासाठी बार्शी, कुर्डुवाडी, भूम, उस्मानाबादसह इतर भागातील मिळून ८ अग्निशामक दलाचे बंब पाठवण्यात आले. रात्री ८ वाजता आग नियंत्रणात आली. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाचे पथक घटनास्थळी पाठवले. बर्न स्पेशालिस्ट पाठवले. एकूण १० डॉक्टरांसह रुग्णवाहिका पाेहाेचल्या. सर्व यंत्रणांशी समन्वय साधण्यातही वेळ गेला, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...