आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यानमाला:छत्रपतींची महती सांगण्यास ‘शिवराज अष्टक’ची निर्मिती ; राेटरी एमआयडीसी तर्फे आयोजन

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची महती जगाला दाखवून देण्यासाठी ‘शिवराज अष्टक’ चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन, प्रख्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले. ते जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेचा समारोप प्रसंगी प्रकट मुलाखतीत बोलत होते. ही मुलाखत ॲड. आनंद देशपांडे यांनी घेतली.

यावेळी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनावर आठ चित्रपट काढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. यातील फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज हे चार लोकप्रिय चित्रपट बनवले आहेत. आता या पुढील चित्रपट तयार करणार आहेत. या मुलाखतीत ते ‘शिवराज अष्टक’ या विषयावर भरभरून बोलले. लांजेकर म्हणाले, वयाच्या नवव्या वर्षापासून ज्येष्ठ इतिहास संशोधक निनादराव बेडेकर यांच्यासोबत राहून खूप शिकता आले. ४० वर्षांपूर्वी भालजी पेंढारकर यांनी श्री शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर चित्रपट तयार केले. त्यानंतरच्या काळात ऐतिहासिक चित्रपट चालणारच नाहीत असा समज झाल्याने या विषयांवर काम करण्याचे धाडस कोणी केले नाही. आम्ही नफ्या -तोट्याचा विचार न करता श्री शिवछत्रपतींच्या आयुष्यावर भव्यदिव्य चित्रपट करायचा, असा निर्धार करून फर्जंद चित्रपटाची निर्मिती केली.

सोनाली जोशी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग, उपाध्यक्ष सुनील पेंडसे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी उपस्थित होते.

अन् पुरंदरेंच्या डोळ्यांत आले पाणी..... लहानपणापासूनच इतिहासात विशेष रस असल्याने छत्रपतींवर मनापासून अभ्यास केला. त्याची परिणीती म्हणून ‘फर्जंद’ तयार झाला.हा चित्रपट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दाखवला.चित्रपट पूर्ण होताच त्यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे तोंड भरून कौतुक केले. पण खरे समाधान तेव्हा समजले जेव्हा चित्रपट पाहिल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे अन् लांजेकर यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, अशी आठवण मुलाखतकार अभिनेते ॲड. आनंद देशपांडे यांनी यावेळी सांगितली.

बातम्या आणखी आहेत...