आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरित वारी अभियान:पालखी मार्गावर 74 गावांत दहा हजार स्थानिक प्रजातींची लागवड; मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती

सोलापूरएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण, शेतकरी करणार संवर्धन

जिल्हा परिषदेने आषाढी यात्रा कालावधीत हरित वारी अभियान हाती घेतले आहे. या उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर दहा हजार वृक्षारोपण वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वारकऱ्यांनी हरित वारी अभियाना अंतर्गत लावलेल्या झाडांचे संवर्धन शेतकरी करणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

जिल्हा परिषदेत गुरुवारी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गटविकास अधिकारी व उमेद अभियानातील तालुका स्तरावरील समन्वयक यांचे व्हीसीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.

माझी वसुंधरा अंतर्गत दोन वर्षे विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विविध योजनांचा कृती संगम घालून आषाढी वारीत याबाबत नियोजन करणेत येत असल्याचे स्वामी म्हणाले. पालखी मार्गावर राष्ट्रीय महामार्गामुळे परिसरातील वृक्षांची संख्या कमी झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पालखी मार्ग हरित होण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे.

७४ गावांत ही मोहीम राबवणार
पालखी मार्गावरील ७४ गावात ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व गावात व्यापक प्रमाणात मोहीम हाती घेण्यात येत आहे. २४ व २५ जूनला वृक्षारोपणासाठी जागा निश्चित करणे, वृक्षारोपण कार्यक्रमाचे जनजागरण, २७ ते २९ जून दरम्यान निश्चित केलेल्या जागेवर वृक्षारोपण करणे, २९ जून ते २ जुलै दरम्यान वृक्षारोपणासाठी स्थानिक प्रजातींची रोपं उपलब्ध करून देण्यात येतील. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी स्थानिक प्रजातींची रोपं लावावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. पालखी मार्गावर स्वच्छतेचे काम सुरू असून स्वयंसेवी संस्था, बचत गट, शेतकऱ्यांची मदत या मोहिमेसाठी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...