आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानसेवेचा पेच:उपोषणाचे चक्र 31 दिवसांनंतर थांबले सोलापूर विकास मंचचे आंदोलन स्थगित

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमानसेवा सुरू करण्याची मागणी करत ५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले चक्रीउपोषण सोलापूर विकास मंचने मागे घेतले. मंचने ३१ व्या दिवशी आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले. केंद्र व राज्याच्या पातळीवर विमानसेवेसाठी सकारात्मक गोष्टी घडत असल्याने आंदोलन थांबवत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

विमानसेवा सुरू करण्यास सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा असल्याचे विमानसेवा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे विमानसेवा सुरू होत नव्हती. दुसरीकडे ही चिमणी वाचवण्यासाठी सुरू झालेल्या प्रतिक्रिया आंदोलनांमुळे शहरात वातावरण संघर्षमय झाले आहे.

मंचतर्फे सांगण्यात आले की, विमानसेवा सुरू करण्याबाबत राज्य व केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. तसेच विमानसेवेसाठी लवकरच हालचाली नाही झाल्यास २८ डिसेंबर रोजी मेकॅनिक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा मंचचे सदस्य केतन शहा व मिलिंद भोसले यांनी दिला.

मंचने सुरू केलेल्या चक्री उपोषणास शहरातील वेगवेगळ्या संस्था, संघटना व व्यक्तींनी पाठिंबा दिला होता. आंदोलनास जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला होता. त्यानंतर प्रशाकीय चक्रे फिरण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान सिध्देश्वर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी आंदोलनस्थळी केतन शहा यांना पिस्तुल दाखवत धमकावले. त्यानंतर ताणतणावाची स्थिती निर्माण झाली.

शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न : शहा
विमानसेवा सुरू करावे ही मागणी सोलापूर विकास मंचची आहे. कारखान्याची चिमणी पाडावी, शेतकऱ्यांचे नुकसान करावे, असे नाही. शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात निष्पाप लोकांचा बळी देण्याचा प्रयत्न आहे. विनापरवाना चिमणी उभी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले, असे केतन शहा म्हणाले.

‘सुशीलकुमार शिंदे राजकारण करतात’
आंदोलन सुरू झाल्यानंतर तब्बल २८ दिवसांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे विमानसेवेविषयी बोलले. ‘होटगी रोड विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होत असल्यास काही अडचण नाही. बोरामणी विमानतळ सुरू करेपर्यंत होटगी रोडवरून प्रवासी विमानसेवा द्या’, असे शिंदे म्हणाले होते.

याबाबत बोलताना केतन शहा यांनी माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. तसेच त्यांची वेळ घेऊन भेट घेणार आहोत असे केतन शहा म्हणाले. यावेळी मंचचे मिलिंद भोसले, प्रसन्न नाझरे, विजय जाधव, योगीन गुर्जर, गणेश पेनगोंडा, अॅड. प्रमोद शहा, अॅड. खतीब वकील, आनंद पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...