आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:‘दक्षिण’चे नेतृत्व प्रणिती शिंदे, सुरेश हसापुरे यांच्याकडे; सुशीलकुमार शिंदे यांची घोषणा

दक्षिण सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘सुरेश हसापुरे यांना मी सुरुवातीस जवळ करत नव्हतो, पण हा माणूस वाघ आहे. याला परत फिरणे माहित नाही. सर्वांशी चांगले संबंध असल्याने विकासाची कामे खेचून आणतो. यापुढे दक्षिण सोलापूरचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे व सुरेश हसापुरे यांच्याकडे राहील’, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांच्या या घोषणेमुळे यापुढे त्यांचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात लक्ष राहणार हे स्पष्ट दिसते.

कारकल येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिंदे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, नगरसेवक बाबा मिस्त्री, चेतन नरोटे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, एम. के. फाउंडेशनचे महादेव कोगनुरे, सुदीप चाकोते, अशोक देवकते, बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, राधाकृष्ण पाटील, सरपंच सुजाता देशमुख व उपसरपंच सिद्धाराम हंजगी, सरपंच चिदानंद कोटगोंडे, संगमेश बगले, अप्पासाहेब चितापुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हसापुरे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमास काँग्रेसच्या शिबिरामुळे येता आले नाही. आज या कार्यक्रमात मी त्यांना शुभेच्छा देतो. आम्ही सत्तेत असताना अनेक विकासकामे केली पण मध्यंतरी गडबड झाली. आज दक्षिण सोलापूरकडे भाजपचे दुर्लक्ष आहे. येथून पुन्हा काँग्रेसचा आमदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, हसापुरे यांच्या कार्यक्रमास मी येऊ शकलाे नाही, त्यांची माफी मागते. सत्ता नसताना अनेक सोसायट्या जिंकल्या, यातून त्यांची ताकद दिसते. हसापुरे व बाबा मिस्त्री, तुम्ही हक्काने मागा आम्ही ते तुम्हाला देऊ. हसापुरे म्हणाले, शिंदे साहेबांमुळे अनेक जण मोठे झाले, पण आता त्यांना सोडून ते जात आहेत. यामुळे शिंदे साहेबांना काही फरक पडणार नाही. काँग्रेस पक्ष हा काम करणारा पक्ष आहे. तळागाळातील जनता आजही आमच्या सोबत आहे.

यावेळी अशोक देवकते, सुदीप चाकोते यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात अमोगसिध्द देशमुख यांनी सोलापूर महापालिकेचे बॅकवॉटर्स क्षेत्रात कारकल येत नाही. तरीही नदीकाठचा वीजपुरवठा खंडित केला जातो. हा प्रश्न सोडवून वीजपुरवठा करण्याची मागणी केली. या कार्यक्रमास लवंगी, सादेपूर, औज, बाळगी, भंडारकवठे, माळकवठे भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...