आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम्हा व्रत एकादशी, देव केशव, तीर्थ तुळशी ! आणिक नेणें बा साधन, आमुचा विषय हरी कीर्तन !! देव भक्तीची हीच परंपरा आणि हेच व्रत घेऊन पंढरीला आलेल्या लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत चैत्री एकादशीचा सोहळा संपन्न झाला. राज्याच्या विविध भागातून आलेल्या अडीच ते तीन लाख वारकऱ्यांनी चंद्रभागा स्नान विठ्ठल दर्शन घेतले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांची गैरसोय झाली नाही. चंद्रभागा नदीत भरपूर पाणी असल्याने भाविकांनी पवित्र स्नानाचा मनसोक्त आनंद घेतला.
रविवारी रुंजी चैत्री शुद्ध कामदा एकादशीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी कुटुंबियांसमवेत. तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांनी कुटुंबीयांसमवेत केली. चैत्री एकादशीनिमित्त मंदिरात विविध फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटेपासून चंद्रभागा वाळवंटात भक्तांचा सागर स्नानासाठी उसळला होता. दर्शन रांगेत उभे राहून हजारो भाविकांनी श्री विठ्ठल दर्शन घेतले. तसेच मुख दर्शन रांगेतूनही हजारो भाविक उभे होते. दर्शनासाठी ६ ते ८ तासांचा वेळ लागत होता.
मंदिर समितीकडून नेटके नियोजन : चैत्री एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, दोन वेळा फराळ, चहा, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाइव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दर्शनरांग दर्शनमंडप, मंदिर व मंदिर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. भाविकांचा मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलगू भाषा अवगत असलेले कर्मचारी नियुक्त केले. दर्शनरांगेत मोफत खिचडी व ताक वाटप करण्यात येत आहे. चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे.
वाखरीच्या जनावराच्या बाजारात मंदीचे चित्र चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तीन वर्षानंतर वाखरी येथील पालखी तळावर जनावरांचा बाजार आयोजित करण्यात आला होता. या बाजारास अपेक्षेनुसार प्रतिसाद मात्र मिळाला नसल्याचे दिसून आले. ७०० ते ८०० जनावरे बाजारात दाखल झाली होती. जनावरांच्या किमती साधारण राहिल्यामुळे आर्थिक उलाढाल कमीच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बसस्थानकावर भाविकांची गर्दी यात्रेसाठी मिळेल त्या वाहनाने वारकरी पंढरीत आले होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला बसने मोठ्या संख्येने आले होते. परतीसाठी या सर्व भाविकांची पंढरपूर बसस्थानकात गर्दी उसळली होती. सायंकाळी उशिरापर्यंत परतणाऱ्या भाविकांना बसची प्रतीक्षा करावी लागली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.