आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल सलाम भाई!:शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे निधन; 54 वर्षे आमदार, 11 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल ५४ वर्षे विधिमंडळात सामान्यांचा आवाज बुलंद करणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पर्व संपले. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख (९४) यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सोलापुरातील रुग्णालयात निधन झाले. सांगोला विधानसभा मतदारसंघातून सलग ५४ वर्षे शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडून येत त्यानी इतिहास रचला.

हयातभर शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहून गणपतराव देशमुख यांनी राज्यातील दुष्काळी स्थिती, रोजगार हमी योजना, शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्य वेचले. सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून त्यांनी विजयाचा विक्रम कायम ठेवला होता. त्यांनी ११ वेळा विधानसभा निवडणूक जिंकली.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुखांना १९७२ व १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने आणि सरकारने त्यांचा गौरव केला होता. गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

बातम्या आणखी आहेत...