आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ब्रेन ट्युमरची हार, श्रद्धाची बाजी; दोन शस्त्रक्रिया, बेडरेस्ट असून मिळवले दहावीत यश

सोलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रेन ट्युमरच्या दोनवेळा अवघड शस्त्रक्रियेतून बाहेर पडलेली श्रद्धा चिल्लाळ हिने दिलेली परीक्षा उल्लेखनीय आहे. शस्त्रक्रियेवेळी शरीराचा उजवा भाग कमकुवत झाला. त्यामुळे उजव्या हाताने लिहिणे शक्य नव्हते. अशाही परिस्थितीत श्रद्धाने लेखनिकाची मदत घेऊन ही परीक्षा दिली आणि ७५ टक्के गुण मिळवले. अनेक विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आणि चिकाटी पहायला मिळते. परंतु मनात दुर्दम्य आशावाद असेल तर कोणतीही परिस्थिती आपल्या यशात अडथळा बनू शकत नाही, हेच श्रद्धाने दाखवून दिले आहे.

श्रद्धा गुंडेराव चिल्लाळ (रा. सैफुल). लहानपणापासून ती अभ्यासात हुशार. श्रद्धा इतर मुलींप्रमाणेच चांगली ठणठणीत होती. लहानपणापासून अभ्यासात हुशार. अडीच वर्षापूर्वी तिला ब्रेन ट्युमरचा त्रास झाला. एकदा मुंबई, एकदा पुण्यात अवघड अशा शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये तिच्या वडिलांची दोन एकर शेती विकावी लागली. तसेच स्वकुळसाळी समाजानेही आर्थिक मदत केली. शस्त्रक्रियेनंतर ती सध्या बेडरेस्टच करत आहे. लहानपणापासून ती ज्या शाळेत होती त्या नामवंत शाळेने तिला अशावेळी सहकार्य केले नाही म्हणून लिमयेवाडी येथील भीमराव जाधव दलित मित्र प्रशालेत प्रवेश घेतला. या शाळेने तिला सर्वतोपरी वेळोवेळी सहकार्य करत प्रोत्साहनच दिले.

श्रद्धाच्या शिक्षणाला व उपचारालाही पाठबळ हवे
शेवटी एका महिन्यात बेडवर झोपूनच तिने दिवस-रात्र अभ्यास केला. तिला हवे ते आणून देण्याचा प्रयत्न आईवडिलांनी केला. रिक्षात बसून, वॉकरच्या सहाय्याने चालत जाऊन लेखनिकची मदत घेऊन तिने परीक्षा दिली. जिद्दी श्रद्धाने दहावीत ७५ टक्के गुण प्राप्त केले. तिच्या जिद्दीला सर्व स्तरातून सॅल्युट केला जात आहे. या सॅल्युटबरोबर तिला गरज आहे ती आर्थिक पाठबळाची. या पाठबळाच्या आधारे ती पुढील उपचार आणि शिक्षण घेऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...