आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शनिवारी वडकबाळ येथे सोलापूर-विजयपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीला जमीन देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील औद्योगिक वसाहतीसाठी आरक्षित क्षेत्र ही नोंद कमी करावी, या मागणीसाठी हे आंदोलन होते.
नियोजित एमआयडीसीसाठी काही शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला आहे. उताऱ्यावरील एमआयडीसीला आरक्षित क्षेत्र ही नोंद कमी करण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. याच मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन केले. जमीन देण्यास विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतीवरच जीवन आहे. उताऱ्यावरील नोंदीमुळे त्यांना अनेक अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांची संमती नसतानाही सातबाऱ्यावर एमआयडीसीचे नाव लावले आहे. उताऱ्यावरील नोंद कमी करावी, अशी मागणी तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व उपजिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, पूजा खंदारे, बालाजी चौगुले, संतोष केंगनाळकर, रेवण बुकानरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती अप्पाराव कोरे, रमेश नवले, भीमाशंकर म्हेत्रे, सुरेश शेंडगे, महेश पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष योगीराज पाटील, धर्मराज बगले, डॉ. शिवानंद झळके, शेतकरी प्रवीण कुंभार यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व मंद्रूपचे शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी मंद्रूप पोलिस ठाण्याचे पीएसआय अमितकुमार करपे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.