आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकृष्ण हरी, तुळस लावा दारी:बीजगोळे, रोप देऊन वनविभाग सोलापूर जिल्ह्यात करणार वारकऱ्यांचे स्वागत

सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या संतोक्तीनुसार वृक्षारोपण, संवर्धनासाठी वनविभागातर्फे पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकऱ्यांचे तुळशीचे (सीडबॉल), तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात येणार आहे. वन विभागाकडे १५ हजार पेक्षा जास्त बीज गोळे तयार आहेत. विद्यार्थी, नागरिकांनी आणखी बीज गोळे तयार करावे, असे आवाहन वनविभागतर्फे करण्यात आले.

वृक्षतोडीची भरपाई करणार

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर यंदा संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासह, सर्व प्रमुख संतांचा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या समवेत पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी मार्गाच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानिमित्ताने रस्ता दुतर्फी अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. नवीन रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक प्रजातींची झाडे लावावीत, यासाठी वन विभागाने स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या बीयांचे गोळे तयार केले आहेत.

जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने सिद्धेश्वर वनविहार मध्ये घेण्यात आलेल्या कार्यशाळेत सात हजारापेक्षा अधिक बीज गोळे तयार झाले होते. इतर काही संस्था, संघटनांच्या मदतीने बीज गोळे तयार केले आहेत. सामाजिक वनीकरण, वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खुडूस (ता. माळशिरस) येथील वनविभागाच्या निसर्ग परिचय केंद्र, उद्यानामध्ये बीजगोळे, तुळशीचे रोप देऊन वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

बीजगोळे करण्याचे आवाहन

संताचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवतोय. जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय सुरू झाले असून, पर्यावरण जागृतीसाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या बीयांचा वापर करून बीजगोळे तयार करून वनविभागाकडे जमा करावेत, असे आवाहन वनविभागतर्फे करण्यात आले. माढा व करमाळा तालुक्यात संतांचे पालखी सोहळे येतात. त्या परिसरातील शाळा, स्वयंसेवी संस्थांनी केलेले बीजगोळे त्या परिसरातील वारकऱ्यांना देण्यात येतील. सोलापूरातील पेपरबॅग उद्योजकाने बीज गोळे ठेवण्यासाठी छोट्या कागदाच्या पिशव्या तयार करून दिल्या आहेत. वारकऱ्यांनी बीजगोळे मुक्काम व विसावाच्या ठिकाणच्या रस्ता दुतर्फा लावावीत, असे आवाहन करण्यात येईल, असे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...