आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे भीमा नदीवर वडापूरला बॅरेज बांधण्याची २० वर्षांपासूनची मागणी असताना चार वर्षांपूर्वी त्यास मंजुरी मिळाली. पण निधीसाठी आजही हा प्रश्न सरकारी दप्तरी रखडलेलाच आहे. दुसरीकडे याच नदीवर कर्नाटक सरकार उमराणी- सादेपूरजवळ बॅरेज बांधत आहे. केवळ दोन वर्षांत मंजुरी मिळवून एक टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या या बॅरेजचे ५० टक्के कामही पूर्ण केले आहे. वडापूरपासून काही अंतरावर जर कर्नाटक बॅरेज बांधत असेल तर मग हे महाराष्ट्राला का शक्य नाही. त्यामुळे या बॅरेजबाबत राज्य सरकारच्या दिरंगाईबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
वडापूर येथे भीमा नदीवर धरण किंवा बॅरेज बांधण्याची सन २००२ पासून मागणी आहे. (कै.) माजी सभापती उमाकांत राठोड यांनी प्रथम वडापूरला यासाठी बैठक घेतली. रास्ता रोको आंदोलन केले. मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. पण काही झाले नाही. या प्रश्नासाठी तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी मनापासून रेटा लावलाच नाही. माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी आमदारकी सोडली. राज्याचे मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी या तालुक्याचे नेतृत्व केले. तेव्हा वडापूर बॅरेजला मंजुरी देऊन निधी देणे त्यांच्या हातात होते. परंतु त्यांनाही हा प्रश्न सोडवता आला नाही. गेल्या २० वर्षांपासून वडापूर बॅरेज होणार याची नुसती चर्चाच आहे. येथे बॅरेज झाल्यास दक्षिण सोलापूरसह मोहोळ व मंगळवेढा भागातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. शेतीचा विकास होणार आहे. मात्र येथे बॅरेज व्हावे, ही तळमळ खरंच सरकारला आहे की नाही, असा प्रश्न शेतकरी व सर्वसामान्य जनता विचारते आहे.
भाजपचे तत्कालीन सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी याप्रश्नी तज्ञ मंडळींच्या उपस्थितीत बैठका घेतल्या. जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करून ४.६७२ दलघमी पाणी साठवण क्षमतेच्या वडापूर बॅरेजला त्यांनी २०१९ मध्ये मंजुरी मिळवली. २० कोटी खर्चाला मान्यता देण्यात आली. नाशिक येथे बॅरेजच्या डिझाइनचे काम सुरू केले. या बॅरेजमुळे १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा विषय पुन्हा रेंगाळला. आता सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचे काम सुरू आहे. अंदाजे ५० कोटी खर्चाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतरच कामाची निविदा निघेल. सोलापुरात जलसंपदामंत्री जयंत पाटील आले होते. या वेळी वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. तर गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुभाष देशमुख यांनी वडापूर बॅरेजला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
कर्नाटक सरकारने दोन वर्षांत उमराणी- सादेपूरजवळ बॅरेजची उभारणी, ५० टक्के कामही पूर्ण
वडापूर बॅरेज होणार कधी
वडापूर येथील बॅरेजला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. येथे बॅरेज झाल्यास १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. उजनी धरणाच्या खालच्या बाजूस कर्नाटकच्या सीमेपर्यंत भीमा नदीची लांबी २६० किलोमीटर आहे. या नदीवर २४ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. काही ठिकाणी बॅरेजेस बांधण्याची मागणी होत आहे. त्यानुसार प्रथम प्रायोगिक तत्त्वावर वडापूर येथे बॅरेज बांधण्यात येणार आहे. मात्र २० वर्षांपासून मागणी असलेल्या या बॅरेजला मुहूर्त लागणार कधी? याची प्रतीक्षा शेतकऱी करीत आहेत.
सुधारित प्रस्तावाच्या मंजुरीनंतर निविदा
भीमा नदीवरील वडापूर बॅरेजला २०१९ मध्ये मंजुरी मिळाली आहे. सुरुवातीस २० कोटी रुपये खर्चाला मान्यता मिळाली. आता खर्च वाढल्याने ५० कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी आम्ही शासनाकडे पाठवत आहोत. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर बॅरेजच्या कामाची निविदा निघेल.
एन. व्ही. जोशी, कार्यकारी अभियंता भीमा कालवा
कर्नाटकात शेतकरी हिताचे निर्णय
उमराणीजवळ एक बंधारा असताना आम्ही दुसरा बंधारा मंजूर करून घेतला. कसलाही गाजावाजा व विरोध न होता ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. पुढील वर्षी पाणी अडवले जाईल. यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना २४ तास वीज मोफत देते. या बॅरेजमुळे नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या शेतीचा विकास होणार आहे.
महादेव भैरगोंड , उमराणी
उमराणी बॅरेजचे ५० टक्के काम पूर्ण
कर्नाटक सरकार उमराणी-सादेपूरदरम्यान एक असताना दुसरा बॅरेज बांधत आहे. १०० कोटीं खर्चाच्या बॅरेजमध्ये एक टीएमसी पाणीसाठा होणार आहे. उजनीतून सोडलेले पाणी येथे अडवले जाणार आहेच. शिवाय अलमट्टीतील कृष्णा नदीचे पाणी संख जवळ भीमा नदीत सोडले जाणार आहे. याचा फायदा नदीकाठच्या दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. पुढील वर्षी हा बॅरेज पूर्ण झाल्यास सोलापूर- मंद्रूपमार्गे चडचण व जत अशी वाहतुकीची सोय होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.