आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:जवळ्यात शिक्षकाने साकारली डिजिटल जंगल क्लासरूम, विद्यार्थ्यांना येतो जंगलाचा अनुभव

सांगोला (जि. सोलापूर) / विठ्ठल देशपांडेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्गातील सर्व भिंतींवर प्राणी, झाडेझुडपे आणि पक्ष्यांची चित्रे

सोलापूर जिल्ह्यातील जवळा येथील तरंगेवाडीमधील सांगोलकर गवळी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक खुशालोद्दीन शेख यांनी स्वत: चार लाख रुपये खर्चून डिजिटल जंगल क्लासरूम साकारली आहे. वर्गात प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांना तेथील वातावरण आणि आवाज एेकल्यावर जंगलात आल्याचा अनुभव येतो.

सांगोलकर गवळी वस्तीवर द्विशिक्षकी शाळा आहे. तेथे चौथी व पाचवीसाठी एकच वर्ग असून २२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी डिजिटल जंगल क्लासरूमचे उद्घाटन झाले. शेख यांनी स्वखर्चातून बसविलेला सीसीटीव्ही कॅमेरा, ग्रंथालय, संगणक कक्ष, निओटर्फ हार्ड मॅट, सिलिंग फॅन, खिडक्यांना पडदे, बगीचा, विद्यार्थी प्रगती फाइल, स्वाध्याय आठवडा पीडीएफ, राज्यातील शिक्षकांसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन मोफत कार्यशाळा या उपक्रमांचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी कौतुक केले.

अशी आहे डिजिटल जंगल क्लासरूम
वर्गातील सर्व भिंतींवर जंगलातील प्राणी, झाडेझुडुपे, पक्षी यांची चित्रे साकारली आहेत. वर्गात प्लास्टिक झाडाच्या फांद्या, फुले, फळे, पक्षी यांची सजावट केली आहे. घनदाट जंगलातील रात्रीच्या वेळेचा विद्यार्थ्यांना अनुभव यावा, यासाठी डिजिटल विद्युत दिवे बसविले आहेत. डाॅल्बी साउंड सिस्टीमद्वारे जंगलातील आवाजाचा इफेक्ट दिला जातो. त्यामुळे वर्गात वाहते पाणी, वारा, पक्षी व प्राण्यांचे आवाज, पडणारा पाऊस यांचे वातावरण तयार होते. परिणामी वर्गात विद्यार्थ्यांना जंगलात असल्याचा अनुभव मिळतो.

राज्यातील शिक्षकांसाठी ११७ कार्यशाळा घेतल्या
कोरोना लाॅकडाऊन काळात माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अध्यापन सुरू होते. शिवाय राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी रोज सायंकाळी ऑनलाइन अध्यापनाविषयी राज्यातील अनेक शिक्षकांना मार्गदर्शन केले. एकूण ११७ कार्यशाळा घेऊन १६ हजार शिक्षकांना तंत्रस्नेही बनविले. - खुशालोद्दीन शेख, शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा, सांगोलकर गवळी वस्ती

विद्यार्थ्यांत शिक्षणाविषयी आवड
शेख यांनी स्वखर्चातून वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. वर्गात शिक्षक आणि विद्यार्थी काय करतात, हे आम्हाला घरात मोबाईलवर समजते. त्यांनी २०१८ मध्ये लॅपटॉप, प्रोजेक्टर विकत घेऊन शाळा डिजिटल केली. त्यामुळे विद्यार्थ्यांत शिक्षणाविषयी आवड निर्माण झाली आहे. - सुरेश गावडे, पालक, तरंगेवाडी

विद्यार्थ्यांना स्वखर्चाने दिले मोबाइल
कोरोना लॉकडाऊनच्या काळात मोबाईल नसल्याने एकही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची शेख यांनी काळजी घेतली. त्यांनी स्वखर्चातून मोबाइल, सिमकार्ड, रिचार्ज केले. सर्व विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ई - लर्निंग सॉफ्टवेअर इन्स्टाॅल करून दिले. - सुहास कुलकर्णी, मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा, सांगोलकर गवळी वस्ती

बातम्या आणखी आहेत...