आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर:नव्या स्वरूपातील अडीच कोटी सात-बारांचे डिजिटलायझेशन, महसूलमंत्र्यांच्या परवानगीनंतर लवकरच होणार वाटप

सोलापूर / विठ्ठल सुतारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गाव नमुना सातमध्ये हे 11 महत्त्वपूर्ण बदल होणार

राज्य शासनाने नवीन सात-बारा देण्यास सप्टेंबर २०२० मध्ये मंजुरी दिली. यानंतर आतापर्यंत राज्यातील सुमारे अडीच कोटी सातबारा उताऱ्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून लवकरच त्याचे वाटप सुरू होणार आहे. याबाबत माहिती देताना राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामदास जगताप म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या परवानगीने या उताऱ्यांचे वाटप लवकरच सुरू केले जाणार आहे.

राज्यातील सर्वच जिल्ह्यांत नवीन सातबारा देण्याचे काम सुरू झाले आहे. सोलापूरमध्ये १० फेब्रुवारीपासून नवीन सातबारा शेतकऱ्यांच्या हाती देण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. यापूर्वी ३ मार्च २०२० ला महाराष्ट्र सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली आहे. शिवाय आता नवीन सातबारा उताऱ्यावर गावाच्या नावासह कोड क्रमांकही येणार आहे.

ब्रिटिश काळात १९४१ मध्ये एम.जे. देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्ये राज्यात नवी महसूल रचना अमलात येत आहेत. नवीन सातबारामुळे जमीन कोणत्या प्रकाराची आहे, हे चटकन समजणार आहे. जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन महसूलचे वाद कमी होण्यास मदत होणार आहेत. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरस मीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांची क्रमांक युनिट क्रमांकांसह नोंद घेतली जाणार आहे.

गाव नमुना सातमध्ये हे 11 महत्त्वपूर्ण बदल होणार
१.
गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजेच लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी टाकण्यात येणार आहे.
२. लागवडीयोग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र स्वतंत्र दर्शवून त्यांची बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद राहील
३. शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर व चौरस मीटर तर अकृषक (एनए) क्षेत्रासाठी चौरस मीटर हे एकक राहील.
. यापूर्वी खाते क्रमांक इतर हक्क या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो खातेदाराच्या नावासमोर असेल.
५. यापूर्वी मृत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंसात दाखवत. आता ही माहिती कंसातच परंतु त्यावर एक आडवी रेष मारून असेल.
६. प्रलंबित फेरफारांची नोंद इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे प्रलंबित फेरफार म्हणून राहील.
. नवीन उताऱ्यात सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक असा रकाना असेल, त्यात जुने फेरफार एकत्रित दर्शवले जातील.
८. खातेदार स्पष्टपणे लक्षात यावेत यासाठी दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष राहील.
९. गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सर्वात शेवटी शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद असेल.
१०. अकृषक (एनए) सातबारा उताऱ्यावरील जमिनीचे एकक आर चौरस मीटर राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कूळ व खंड हे रकाने नसतील.
११. एनए उताऱ्यात शेवटी हे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर १२ ची आवश्यकता नाही, अशी स्पष्ट सूचना राहील.

बातम्या आणखी आहेत...