आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतनवाढ:साखर कामगारांची दिवाळी गोड; 12 टक्के वेतनवाढ, एप्रिलपासून फरकही मिळणार

साेलापूर / श्रीनिवास दासरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहकार, खासगी आणि भाडेतत्त्वावर चालणाऱ्या साखर कारखान्यांतील कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. १ एप्रिल २०१९ पासून त्याचा अंमल करण्याचे परिपत्रक शासनाने काढले. त्यामुळे कामगारांना फरकासह वेतनवाढ मिळणार आहे. दुसऱ्यांचे ताेंड गाेड करणाऱ्या या कामगारांची दिवाळी अधिक गाेड हाेईल.

राज्यातील साखर कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठित करण्यात आली हाेती. कामगार व कारखानदारांचे प्रतिनिधी असलेल्या या समितीत ‘सामंजस्य करार’ झाला. या करारनाम्यासह शिफारशींचा अहवाल शासनाला देण्यात आला. त्या सर्व शिफारशी शासनाने स्वीकारल्या. त्याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक २९ आॅक्टाेबर २०२१ राेजी काढले. समितीने केलेल्या करारानुसार १ एप्रिल २०१९ राेजी हजेरी पत्रकारवर वेतनश्रेणीत पगार घेत असलेल्या सर्व कायम आणि हंगामी कामगारांना मिळणाऱ्या मूळ वेतन, महागाई भत्ता, स्थिर भत्ता मिळून १२ टक्के वेतनवाढ देण्यात येईल.

२०१९ नंतर नव्याने समाविष्ट कामगारांना कराराने हाेणारे किमान वेतन देण्यात यावे, असेही त्यात म्हटले आहे. एकूण पगारवाढीत धुलाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आदींचा समावेश आहे.

सुमारे २२ हजार कामगारांना लाभ : साेलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. त्यांची संख्या ४० असली तरी प्रत्यक्ष उत्पादन सुरू असलेल्या ३२ कारखान्यांतील सुमारे २२ हजार कामगारांना वेतनवाढीचा लाभ हाेईल. त्याच्या अंमलाची जबाबदारी साखर आयुक्त आणि कामगार आयुक्त यांच्याकडे साेपवण्यात आली. प्रत्यक्ष अंमल केलेल्या कारखान्यांच्या यादीसह कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे पाठवणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व कारखान्यांनी तातडीने या परिपत्रकानुसार वेतनवाढ देण्याचे आवाहन कामगार आयुक्त कार्यालयाने केले आहे.

अशी असेल वेतनवाढ
वर्गवारी सध्याचा पगार सुधारित वेतन
अकुशल १६ हजार ९००, २३ हजार ७००
निमकुशल १७ हजार २५०, २४ हजार ०५०
कुशल-ब १७ हजार ८५०, २४ हजार ८५०
अतिकुशल १८ हजार ६५०, २५ हजार ४५०
कारकून-१ १९ हजार ००, २५ हजार ८००
सुपरवायझर २० हजार ५००, २७ हजार ३००
(कारकून व सुपरवायझर यांच्यात श्रेणी वर्गवारी आहे)

बातम्या आणखी आहेत...