आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात राष्ट्रवादी युवकचे आंदोलन:नहीं चाहीये अच्छे दिन; कोई लौटादो मेरे बीते हुए दिन असे म्हणत केंद्र सरकारचा निषेध

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील भाजप सरकारच्या महागाई विरोधात सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "महागाईची हंडी" फोडण्यात येऊन मोदी सरकारच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन करण्यात येऊन वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला.

यूपीएचे सरकार असताना केवळ पाच रुपयांनी सिलेंडर महागला असताना भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी यूपीए सरकारला बांगड्या पाठवल्या होत्या. आता सिलेंडरच्या दराने हजाराचा आकडा गाठला असताना स्मृती इराणी आणि त्यांचे मोदी सरकार झोपा काढत आहे काय ? आता त्यांना कोणी बांगड्या द्यायच्या असा संतापजनक सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

सामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या गाजरामुळे जनतेचे पोट भरत नाही, हे मोदींना दाखवून देण्यासाठी आज गोकुळाष्टमी दिवशी "महागाईची हंडी" फोडण्यात आली आहे. केंद्र सरकार देशभरातील जनतेच्या मुळावर उठले आहे. मोदी सरकारने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी यावेळी बोलताना दिला.

आज गोकुळाष्टमी आहे. केंद्रात नरेंद्र मोदी जरी आपल्या सहकाऱ्यांसमवेत गोकुळाचा आनंद लुटत असले तरी देशभरातील जनता मात्र महागाईमुळे आनंदोत्सव साजरा करू शकत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. देशात नुकताच आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा हे अभियान राविण्यात आले. हे अभियान राबवत असतानाच घराघरात आलेली महागाई संपविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पाऊल उचलले असते, तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळाला असता, असेही जुबेर बागवान यांनी सांगितले.

निषेधाची "हंडी" आणि महागाईने झाली "कोंडी"

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेले आंदोलन लक्षवेधी होते. एका मोठ्या दोरीला मध्यभागी निषेधाची हंडी बांधून त्यामध्ये सरकारचा निषेध करणारी छोटी कात्रणे टाकण्यात आली होती. तर हंडीच्या दोन्ही बाजूला तेल, पालेभाज्या, दूध ,धान्य तसेच गॅस यांचे प्रतीकात्मक पाऊच लटकवण्यात आले होते .यामुळे मोदी सरकारच्या विरोधातील वाढत्या महागाईचे आंदोलन आणखीनच लक्षवेधी ठरले.

बातम्या आणखी आहेत...