आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामच असे करा की माहिती अधिकाराची भीती नको:पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सीईओ दिलीप स्वामींचे मार्गदर्शन

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती अधिकार कायद्याबाबत जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांना कायद्यान्वये अर्जाचे उत्तर कसे द्यावे याची माहिती नाही. त्यामुळे एखादा अर्ज आला की गोंधळ उडतो. त्यामुळे माहिती अधिकार अर्जाची गरज भासणार नाही. असे काम जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी करावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी बोलत होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी यशदाचे व्याख्याते शिवाजीराव पवार, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, सुनील कटकधोंड, उपअभियंता राजकुमार पांडव, सतीश मंडलिक, अजित वाघमारे, उमेश कुलकर्णी, प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर, अनिल जगताप,जहीर शेख, सिद्धाराम बोरुटे, मल्लिकार्जुन तलवार, आप्पासाहेब भोसले उपस्थित होते.

अर्जांचे प्रमाण कमी होईल

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील माहिती अधिकार कायद्याच्या प्रत्येक अर्जाला सकारात्मक उत्तर देऊन नागरिकांना अभिलेख पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले तर माहिती अधिकार कायद्याचे येणारे अर्जांचे प्रमाण कमी होईल. ज्यामुळे लोकांचा प्रशासनावरील विश्वास वाढेल.

या कार्यशाळेला जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी केले तर शेवटी कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी आभार मानले.

हा तर पाठीवर बॉम्ब

माहिती अधिकार कायदा होऊन सतरा वर्षे झाली पण शासकीय कार्यालयातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना कायद्याविषयी माहिती नाही. या कायद्याचे ओझे ते पाठीवर घेऊन फिरत असतात. पाठीवरच्या बॉम्ब सारखी ही कर्मचाऱ्यांची स्थिती आहे. एखादा अर्ज आला की मग त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवरचा बॉम्ब फुटतो. या कायद्याबाबत व्यर्थ भीती न बाळगता तरतुदी समजून घ्या, अर्जाला उत्तर देणे एकदम सोपे होऊन जाईल असे स्पष्टीकरण शिवाजीराव पवार यांनी यावेळी दिले.

बातम्या आणखी आहेत...