आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:गिरणी कामगारांच्या लढ्यामुळे सोलापूरकरांनी स्वातंत्र्याचा श्वास घेतला

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधींना अटक झाल्याचे पडसाद सोलापुरात उमटले. त्यानंतर राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेले कामगार रस्त्यावर उतरले. त्यांच्या क्रांतिकारी लढ्यामुळेच ब्रिटिशांच्या राजवटीत सोलापूरकरांनी तीन दिवस स्वातंत्र्याचा श्वास घेतला. चार हुतात्म्यांच्या प्राणार्पणाने त्याची किंमतही मोजावी लागली, असे ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांनी सोमवारी येथे सांगितले. सोलापूरच्या ऐतिहासिक ‘मार्शल लॉ’ ला यंदा ९२ वर्षे होत आहेत. त्याच्या स्मृती जागवण्यासाठी दत्त नगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बाेलत होते. भाकपचे ज्येष्ठ नेते अॅड. रा. गो. म्हेत्रस, सीटूचे राज्य महासचिव अॅड. एम. एच. शेख, किसान सभेचे सिद्धप्पा कलशेट्टी, युसूफ शेख, रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे आदी मंचावर होते. अनिल वासम यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

२० वर्षीय शंकर शिवदारे पहिला हुतात्मा झाला....
५ मे १९३० रोजी मध्यरात्री गांधींना अटक करून येरवाड्यात पाठवले होते. दुसऱ्या दिवशी त्याची वार्ता पसरली. गिरणीतून कामगार बाहेर पडले. ठिकठिकाणी निदर्शने करू लागले. रूपाभवानी परिसरातील शिंदीच्या बनात कामगार एकवटले होते. त्या वेळी कलेक्टर नाइट आले. त्यांच्यासमोर २० वर्षांचा मुलगा तिरंगा झेंडा घेऊन आला. क्रांतिकारकांना सोडण्याची मागणी केली. त्याच्या छातीवर गोळी झाडण्यात आली. त्याने कामगार प्रचंड संतापले होते. मल्लप्पा धनशेट्टी यांनी कामगारांना शांत करून त्यांच्या गराड्यातून कलेक्टर नाइट यांची सुटका केली. परंतु याच धनशेट्टी यांच्यासह जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा, कुर्बान हुसेन यांची धरपकड करून त्यांना फासावर चढवण्यात आले. त्यांचे हौतात्म्य देशाच्या इतिहासात नोंद झाले पाहिजे.

गौरवशाली स्वातंत्र्य लढ्याचे आज स्मरण
स्वातंत्र्य चळवळीतील सोलापूरच्या मार्शल लॉ च्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण म्हणून इतिहासप्रेमी मंडळींच्या वतीने मंगळवारी चार वाजता चार हुतात्मा पुतळा येथे सायंकाळी ५ वाजता सभा आयोजित केली आहे. या सभेत देशप्रमाने भारावलेल्या इतिहासाचे स्मरण व चार हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे यांनी सांगितले.

सर्वधर्मीय नेतृत्व, बंडाने जागतिक पातळीवर नोंद
ब्रिटिशांच्या दडपशाहीविरोधात सोलापुरातील सर्वधर्मीय नेतृत्व पुढे आले होते. ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारला. त्याची परिणती म्हणजेच तीन दिवसांचे साम्राज्यमुक्त सोलापूर आपण पाहिले. हा इतिहास सोलापूरच्या भविष्यासाठी जागवलाच पाहिजे.
अॅड. एम. एच. शेख

बातम्या आणखी आहेत...