आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही आमदारांना नाहरकत:निवडणुकीची घाई : विजय देशमुखांच्या मतदारसंघात पालकमंत्री, शिंदेंची कामे, पालिकेची अभियंत्याला नोटीस

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणूकपूर्व श्रेयवादाची लढाई सुरू असून, एकाने सुचवलेले काम दुसरेच करत असल्याचा प्रकार बुधवारी मनपा आयुक्तांसमोर उघडकीस आला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन कामाची टेंडर प्रक्रिया केली असता प्रत्यक्षात तेथे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन तक्रार केली. विनोबा भावे झोपडपट्टी आणि बाळे येथील संतोष नगरात असे प्रकार झाल्याचे आमदार देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

शहरात काम करण्यासाठी महानगरपालिकेचा ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. त्यानुसार दाखला घेतला जातो. एकाच कामाचा दोन आमदारांना ना हरकत दाखला दिल्याने कामावर परिणाम होत असल्याची तक्रार करत आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. प्रभाग क्रमांक ९ मधील विनोबा भावे झोपडपट्टीत सभामंडप व फरशीकरण कामासाठी आमदार देशमुख यांना २७ लाखांच्या कामास पालिकेने दाखला दिला. त्याच कामासाठी पायाभूत सुविधा अंतर्गत आमदार प्रणिती शिंदे यांनाही पालिकेने दाखला दिल्याचे समोर आले आहे. बाळे परिसरातील संतोष नगरात असाच प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याप्रकरणी संबंधित अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

महापालिकेकडून ना हरकत दाखला देताना यापूर्वी कोणास दाखला दिला का? याची पडताळणी करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही. शहर उत्तर विधानसभा मतदार संघात विनोबा भावे झोपडपट्टी असून, तेथे सभा मंडप व फरशीकरण कामासाठी आमदार देशमुख यांनी २७ लाखांचे काम सुचवले. त्यास पालिकेने ना हरकत दाखला दिला. तेथील कामासाठी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत आमदार प्रणिती शिंदे यांना पालिकेने ना हरकत दाखला दिला. यामुळे कामास दिरंगाई होते. आमदार निधी खर्च होण्यास वेळ लागतो. याबाबत आमदार देशमुख यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली.प्रभाग क्रमांक ५ येथील संतोष नगरात मूलभूत सुविधेसाठी आमदार देशमुख यांनी ३० लाखांचे काम सुचवले. पालिकेने ना हरकत दाखला दिला. टेंडर झाले. प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यासाठी गेले असता तेथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नगरोत्थान योजनेअंतर्गत दिलेल्या निधीतून काम सुरू होते. या कामाबाबत आमदार देशमुख यांनी तक्रार केली.

अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस
एकाच कामास दोघांना ना हरकत प्रमाणपत्र दिले. याप्रकरणी संबंधित अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस काढणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

हद्दीचा वाद
विनोबा भावे झोपडपट्टी शहर उत्तर की शहर मध्य मतदार संघाच्या हद्दीत, असा वाद समोर येत आहे. आमदार देशमुख कार्यालयाकडून तो भाग शहर उत्तर मतदार संघाचा असल्याचे सांगण्यात आले. आमदार शिंदे यांच्या कार्यालयाकडून तो भाग मध्यमध्ये येत असल्याचे सांगण्यात आले.

दोघांना ना हरकत देणे चुकीचे आहे
आम्ही काम सुचवत असताना पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र घेतो. विनोबा भावे झोपडपट्टीत सभामंडपासाठी दोघांना ना हरकत प्रमाणपत्र दिले. हे चुकीचे असून, काम करताना अडचणी येतात. त्यामुळे आम्ही पालिका आयुक्तांना भेटलो. गुंठेवारीप्रकरणी बांधकाम परवाना द्यावा, अशी मागणी मी विधानसभेत केली. महापालिका आयुक्तांकडे केली आहे.'' विजयकुमार देशमुख, आमदार

माहिती घ्यावी लागेल
मी अनेक कामे सुचवते. ३०० कामांची यादी दिली, त्यात पाहवे लागेल. विनोबा भावे झोपडपट्टी माझ्या मतदार संघात येते. कामाचे ठिकाण आणि तो भाग पाहावा लागेल.'' प्रणिती शिंदे, आमदार

बातम्या आणखी आहेत...