आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्राची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी जाहीर झाली. १८ जागांसाठी ही निवडणूक असून, सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभही झाला. पहिल्याच दिवशी इच्छुकांनी ८३ अर्ज नेले. पैकी एक अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. गावडे यांनी दिली. शुक्रवार (ता. १७) पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.
रुग्णालयाच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी २०२१ मध्येच संपुष्टात आलेली होती. कोविड-१९ मुळे मुदतवाढ मिळाली. पूर्वभागातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्ती या संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून होते. अखेर दीड वर्षाने त्याचा कार्यक्रम जाहीर झाला. १७ जुलैला मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
आलेल्या सर्व अर्जांची २० जूनला छाननी होईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी (ता. २१) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत राहील. त्यानंतर १७ जुलैला मतदान आणि त्याच दिवशी निकाल असा हा एकूण कार्यक्रम आहे. संस्था सभासद आणि वैयक्तिक सभासद (प्रत्येकी ५ जागा), वैद्यकीय प्रतिनिधी (३), महिला प्रतिनिधी (२), अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी (१), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (१), विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग (१) अशा एकूण १८ जागा आहेत.
स्वामी समर्थ सूतगिरणी छाननीत १७ अर्ज बाद
वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीच्या १७ जागांसाठी ७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी त्यांची छाननी झाली. त्यातून १७ अर्ज निकाली काढण्यात आली. ६२ अर्ज वैध ठरले. त्यांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकतींमध्ये सूचक आणि अनुमोदक हे इतर मतदारसंघातील असल्याचा मुद्दा होता. त्याशिवाय जातीचा दाखला चुकीचा लावणे, दोनपेक्षा अधिक दांपत्य असणे या मुद्द्यांवरही अर्ज निकाली काढण्यात आले. सहकारमहर्षी, माजी आमदार वि. गु. शिवदारे यांनी स्थापन केलेल्या या गिरणीवर त्यांचे चिरंजीव राजशेखर शिवदारे यांचे नेतृत्व आहे. उत्कृष्टतेचे अनेक पुरस्कार या गिरणीला मिळाले. कापूस दरवाढीमुळे सध्या गिरणी अडचणीतून मार्ग काढत आहे. अशा स्थितीत ही निवडणूक लागली. त्यात दक्षिण सोलापुरातील सहकार कार्यकर्ते सुरेश हसापुरे यांनी उडी घेतली. त्यामुळे निवडणूक चर्चेत आली.
शरद बँक : १३ जागांसाठी २३ अर्ज
शरद सहकारी बँकेच्या १३ जागांसाठी २३ अर्ज दाखल झाले आहेत. आलेल्या अर्जांची सोमवारी छाननी झाली. वैध उमेदवारांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बँकेचे संस्थापक मनोहर सपाटे, प्रा. महेश माने, ज्ञानेश्वर सपाटे आदींनी अर्ज दाखल केला. विद्यमान संचालक विजया थोबडे, शिवानंद उंब्रजकर, महंमद शेख, गगन अंकुशे, विलास झरेकर यांनी अर्ज भरलेला नाही.
महेश बँक : माघारीदिनीच अविरोध
महेश सहकारी बँकेच्या १७ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आलेल्या अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. १७ जागांसाठी १७ अर्ज उरले. त्यामुळे बँकेची ही निवडणूक अविरोध ठरली. मात्र त्याची घाेषणा माघारीच्या दिवशीच (ता. २८ जून) होईल. बँकेचे संस्थापक अनिल सिंदगी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इच्छुकांनी माघार घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.