आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठाची सिनेट निवडणूक:उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; 29 सप्टेंबर रोजी मतदान

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळे या अधिकार मंडळांच्या निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. यासाठी 29 सप्टेंबर 2022 रोजी यासाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव सी. ए. श्रेणिक शाह यांनी दिली.

असे सदस्य निवडणार

अधिसभेच्या प्राचार्य मतदारसंघातून 10 सदस्य, संस्था प्रतिनिधीसाठी 6 , शिक्षकांसाठी 10, पदवीधर मतदारमधून 10 तर विद्यापीठ शिक्षकांमधून 3 सदस्य निवडून येणार आहेत. यासाठी आरक्षण विद्यापीठाकडून पूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. विद्यापरिषदेसाठी प्रत्येक विद्याशाखेचे दोन शिक्षक निवडून येणार आहेत. एकूण चार विद्याशाखा आहेत. त्यानुसार सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत. त्याचबरोबर अभ्यासमंडळासाठीही निवडणूक होणार आहे. प्रत्येक अभ्यास मंडळावर तीन महाविद्यालयीन अथवा मान्यताप्राप्त संस्थेचे विभागप्रमुख निवडले जाणार आहेत. या तिन्ही अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

2 ऑक्टोबरपर्यंत मतमोजणी

12 सप्टेंबर 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 13 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. 16 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. 17 सप्टेंबर 2022 रोजी उमेदवारी अर्जावर आवश्यक असल्यास माननीय कुलगुरूंकडे अपील करता येणार आहे. रविवारी 18 सप्टेंबर 2022 रोजी पात्र उमेदवारांच्या नावाचे नोटिफिकेशन निवडणूक पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानुसार 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत शहर व जिल्ह्यातील 16 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 30 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत मतमोजणी होणार आहे.

सुट्टीच्या दिवशीही अर्ज करता येणार

सर्व अधिकार मंडळाची निवडणूक नोटीस विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने निवडणूक नोटीसमध्ये नमूद केलेल्या आरक्षणाबाबतच्या, शैक्षणिक अहर्ताबाबतच्या व अनुभवाबाबतच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. 9 सप्टेंबर, 10 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी या सुट्टीच्या दिवशी देखील उमेदवारांच्या सोयीसाठी विद्यापीठातील सभा व निवडणूक विभाग, वित्त व लेखा विभाग आणि आवक विभाग सुरू राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीए श्रेणिक शाह यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...