आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी आढावा:आषाढीमध्ये पाणी, स्वच्छता, भाविकांच्या सुरक्षेवर भर द्या; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी वारीसाठी विविध जिल्ह्यांतून तसेच इतर राज्यांतूनही लाखो भाविक पंढरपुरात येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छता आणि सुरक्षा यावर भर देण्याच्या सूचना अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाबाबत संबंधित विभागाच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांत अधिकारी गजानन गुरव, अप्पासाहेब तुपसमिंदर यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले,“यंदाच्या वर्षी वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. स्थानिकांसह वाढलेल्या संख्येचा विचार करून स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा. तसेच, ६५ एकर पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट आदी ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. याठिकाणी मुबलक प्रमाणात शौचालयाची व्यवस्था करावी. याचबरोबर तात्पुरते शौचालय उभी करून त्याच्या वेळच्या वेळी स्वच्छतेसाठी यंत्रणा उभी करावी, वेळोवेळी पाहणी करावी. ज्या मठप्रमुखाने तात्पुरत्या शौचालयांची मागणी केली असेल त्यांना उपलब्ध करून द्यावीत. वारी कालावधी वारकऱ्यांना गॅस वितरण व्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता गॅस वितरण कंपनीने घ्यावी. तीन जुलैपासून पंढरपुरातील हॉटेल्स, प्रसाद दुकाने याची नियमित तपासणी होईल. अन्नातून विषबाधा होणार नाही, शिळे अन्न वारकऱ्यांना देऊ नये, याबाबत मठप्रमुखांना सूचना द्याव्यात. पंढरपूर शहर, पालखी मार्ग येथील औषध विक्री दुकाने दिवस-रात्र सुरू राहतील, याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशाही सूचना श्री. शंभरकर यांनी केल्या.

महावितरण कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी, शहरात अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा राहील याची दक्षता घ्यावी. जलसंपदा विभागाने यात्रा कालावधीत भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत नियोजन करावे. जेणेकरून वारकऱ्यांना चंद्रभागा स्नानासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच नदीपात्रातील वाहतूक करणाऱ्या होड्या यांना आवश्यक सुरक्षितेच्या सूचना द्याव्यात. गरजेच्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था करावी. याठिकाणी तज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

मोबाइल संपर्क सुविधेसाठी २१ ठिकाणी हॉटलाइन
अपर जिल्हाधिकारी श्री. जाधव यांनी सांगितले की, वारी कालावधीत सर्व मोबाइल जॅम होतात. संपर्कासाठी फोनची सुविधा खंडित होऊ नये.यासाठी बीएसएनएलने टॉवरची क्षमता वाढवून २१ ठिकाणी हॉटलाइन सुविधा द्यावी. हिंमत जाधव म्हणाले, गॅस वितरण आणि डिलिव्हरीच्या ठिकाणी रेस्क्यू टीम ठेवावी. मोबाइल सेवेसाठी विविध कंपनीचे मोबाइल व्हॅन टॉवर राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...